जळगाव : कौटुंबिक वादातून पोलीस उपनिरीक्षकाने झाडली पत्नीवर गोळी

0

जळगाव : कौटुंबिक वादातून गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने जळगावातील लक्ष्मीनगरातील माहेरवाशिण असलेल्या पत्नीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली.धनराज बाबूलाल शिरसाठ (वय 34, मूळ राहणार मुसळी, ता. धरणगाव) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे तर संगीता धनराज शिरसाठ (वय 28) असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. दरम्यान संगीता या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांचा भाऊ गणेश याने सांगितले.

दरम्यान, धनराज यांनी संगीत यांच्यावर गोळी झाडली तेव्हा त्यांची सात वर्षीय मुलगी भार्गवी हिने जळगावातील मामा गणेश सपके यास मोबाईलवरुन संपर्क साधला अन् रडत रडतच मामा…पप्पाने मम्मीच्या डोक्यात बंदुकीने गोळी मारल्याची माहिती दिली.

याबाबत सविस्तर असे की,  लक्ष्मीनगरातील संगीताचा विवाह धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील धनराज शिरसाठ यांच्याशी झाला. त्यांना सात वर्षाची मुलगी भार्गवी व चार वर्षाचा मुलगा शिवा, अशी दोन मुले आहेत. धनराज शिरसाठ हे मुंबई येथे पोलीस हवालदार होते. 2017 मध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पहिलीच नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात मिळाली. त्यानुसार पत्नी व मुलासह ते मुलचेरा येथील पोलीस वसाहतीत वास्तव्यास आहेत.

वर्षभरापासून धनराज व संगीता यांच्यात वाद सुरु आहे. याबद्दल संगीता हिने जळगावात राहत असलेल्या आपल्या वडिलांना माहिती दिली. त्यानुसार वडिलांनी धनराज याच्या आई व वडिलांना मुलगा धनराज याची समजूत काढण्याचे सांगितले होते. याप्रमाणे समजूत काढण्यासाठी लॉकडाऊनपूर्वी धनराज याचे वडील बाबूलाल नामदेव शिरसाठ व आई सुशिला शिरसाठ हे मुलचेरा येथे गेले होते. या दरम्यान गुरुवारी 7 मे रोजी, दुपारी धनराज व पत्नी संगीता यांच्यात भांडण झाले. या भांडणातून धनराज याने त्याच्याजवळ असलेल्या रिव्हॉल्वरने पत्नी संगीतावर गोळीबार केला. यात एक गोळी संगीताच्या डोक्यात शिरली, तर दुसरी गोळी कानाला चाटून गेली. या प्रकारानंतर घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेली संगीताची मुलगी भार्गवी हिने तिचे जळगावातील मामाला तसेच बाबा यांना मोबाईलवरुन संपर्क साधला. घटनेची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.