चिखली – तरसोद चौपदरीकरण कामाचा शुभारंभ तर झाला..

0

तरसोद ते चिखली या महामार्ग चौपदरीकरणांच्या कामाचा शुभारंभ अखेर अक्षय तृतीयच्या मुहूर्तावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पार पडला. या शुभारंभ सोहळ्याला खा.रक्षा खडसे, जिल्हा बँंक चेअरमन रोहिणी खडसे आणि एकनाथराव खडसेंचे समर्थक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे नेते अथवा कार्यकर्त्यांची या सोहळ्याला अनुपस्थिती होती. गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या तरसोद-चिखली चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाल्याची चांगली वार्ता असली तरी या शुभारंभाला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना डावलले गेल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. गेल्या तीन वर्षात या कामासाठी तीन ठेकेदार बदलले गेले. एलअ‍ॅण्डटी कंपनीने तर आपला डेपो उभा करून कामालाही सुरुवात केली होती. माशी कोठे शिकली कळत नाही. अचानक काम बंद करून त्या कंपनीने डेपो सुध्दा येथून हलविला. त्यानंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या ठेकेदाराने ठेका घेतला. त्यांनीही काम न करता ठेका रद्द करून निघून गेले. अखेर चौथ्या ठेकेदाराने घेतलेल्या ठेक्याचा शुभारंभ झाला आहे. आता या शुभारंभाला दृष्ट लागायला नको हीच जनतेची अपेक्षा आहे. कारण फागणे ते तरसोदपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम ज्या गतीने होते आहे. त्या तुलनेत तरसोद ते चिखली चौपदरीकरणाचे काम तितकेच मागे पडले आहे. ते का मागे पडले. वगैरेच्या खोलात जाण्याच्या एवजी ते काम द्रुतगतीने होण्याच्या दृष्टीने आता सर्वच राजकीय पक्षाने सहकार्य करणे गरजेचे आहे.
तरसोद – चिखलीपर्यंतच्या चौपदरीकरण कामाचा शुभारंभ चिखली ऐवजी तरसोदला व्हायला हवा होता. कारण तरसोद येथे असलेल्या जागृक गणपतीची पुजा करून कामाचा शुभारंभ करायला हवा होता. असा एक नव्या वादाला सुरुवात झाली आहे. तरसोद हे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात असल्याने त्याठिकाणी कामांचा शुभारंभ झाला असता. तर त्याचे श्रेय गुलाबरावांना मिळाले असते. म्हणून खडसेंनी चिखली या त्यांच्या मतदार संघातील गावाची निवड केली असे बोलले जाते. पुढे निवडणूकीचा हंगाम आहे. निवडणूकीत मतदारासमोर जातांना आपल्या कामांचा लेखा-जोखा देण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार करीत असतात. परंतु एखादा सार्वजनिक उपक्रम सुरु करत असतांना सर्वांना समाविष्ट करून घेणे गरजेचे असते. तरसोद अथवा चिखली कोठेही शुभारंभ करायला हरकत नाही परंतु कार्यक्रमाला शिवसेनेसह विरोधी पक्षाला आमंत्रण देेणे आवश्यक होते आणि हे काम महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍याने करायला हवे. महामार्ग प्राधिकरणाचे संचालक अरविंद काळे यांच्या डिपार्टमेंटकडून सर्वांना निमंत्रण देणे आवश्यक होते. त्यांनी कुणा-कुणाला निमंत्रण दिले याची कल्पना नाही. निमत्रंण देवूनही सेनेचे नेते आले नसते तर त्यांना हा प्रश्‍न प्रतिष्ठेचा करण्याचा काहीच अधिकार नसता. निमंत्रण दिले नसल्यास हा राजकीय वादाचा विषय होवू शकतो. आणि अशा प्रकारचा राजकीय वाद होणार नाही याची काळजी अधिकार्‍यांनी घेणे आवश्यक असते. याचे उत्तर महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीच देवू शकतात.
सुमारे अडीच वर्षापूर्वी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते मोठ्या थाटात जळगावला जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचा थाटात शुभारंभ झाला होता. त्या कार्यक्रमाला तत्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथराव खडसे आणि दोन्ही खासदार हे ही उपस्थित होते. सुरत-अमरावतीपर्यंतच्या महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला जोमाने सुरुवात झाली. सुरत – धुळे पर्यंतचे काम तर जळगाव जिल्ह्यापेक्षा किती तरी पटीने प्रगतीपथावर झाला. चिखली ते अमरावतीपर्यंतचे कामही बिन दिकत सुरु झाले. फागणे ते चिखली या जळगाव जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्ग चौपदरीकरणाला मात्र ग्रहन लागले. फागणे-चिखलीपर्यंतच्या कामाचा ठेका घेण्यास ठेकेदार तयार होत नसल्याने त्याचे दोन भाग केले गेले. फागणे ते तरसोद आणि तरसोद ते चिखली असे दोन टप्पे करून ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला. फागणे ते तरसोदच्या कामाची निविदा दिली गेली ते कामही सुरु झाले. त्यानंतर तरसोद-चिखलीपर्यंतच्या कामाचीही दोन वेळा निविदा काढण्यात आली. ठेकेदाराने निविदाही स्विकारली पण काम न करता ते सोडून गेले. त्याचा परिणाम तीन वर्षे हे काम रखडले गेले. आता नविन ठेकेदाराने कामांचा शुभारंभ केला असल्याने आतातरी त्याला ग्रहण लागायला नको. या चौपदरीकरणाच्या कामासाठी आ.एकनाथराव खडसे, खा.रक्षा खडसे यांनी केलेले प्रयत्न दुर्लक्ष करूनही चालणार नाही. म्हणून आता चौपदरीकरणाच्या कामाच्या शुभारंभानंतर राजकीय वाद न वाढवता. या कामाला गती देवून निहित कालावधीत हे काम पूर्ण व्हावे हीच जनतेची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.