चिंधी – सिंधू अन्‌ मायीला अखेरचा सलाम…!

0

अनाथांची माय सिंधूबाई सपकाळ यांचे हृदयविकाराने काल निधन झाले. शेकडो मुलं – मुली आपल्या मायीपासून पारखे झाली. ही मुलं मायेच्या प्रेमाला मुकली असली तरी या सर्व मुलामुलींना खडतर जीवनाच्या वाटेवर चालण्याची शिकवण मायींकडून त्यांना मिळाली. आज महाराष्ट्राच्या विविध भागात सिंधूताई सपकाळांच्या चार संस्था आहे. स्वत:चा ट्रस्ट त्यांनी स्थापन करून त्यातून अनाथ मुलामुलींच्या शिक्षणाची तसेच संगोपनची व्यवस्था केली जातेय. सिंधूताई शेकडो अनाथ मुलामुलींची मायी झाली असली तरी स्वत:च्या मुलीला मात्र दुसऱ्या अनाथालायात ठेवली. आपली मुलगी आपल्याजवळ राहिली तर इतर अनाथ मुला-मुलींवरची माया कमी होईल. स्वत:च्या मुलीला मायेचं झुकतं माप जाईल हे तत्वज्ञान त्यामागे असणे हा आईचा फार मोठा त्याग म्हणावा लागेल.

सिंधुताई 14 नोव्हेंबर 1947 साली वर्धा जिल्ह्यातील नवरगाव या अति मागास खेड्यात जन्माला आली. वडील अभिमान साठे गुरं राखायचे. आई घरकाम करणारी. आई – वडीलांना अक्षर ओळख नव्हती. सिंधूताईने लहानपणीचे नाव चिंधी. चिंधीनं शाळेत जाऊन शिकल पाहिजे अशी वडीलांची इच्छा असली तरी आईचा त्याला सक्त विरोध. तिनेसुध्दा गुरं राखली पाहिजेत म्हणून गुरं राखायला तिला पाठविले जात. गुरं अर्थात म्हशी पाण्यात बसल्या की, त्या दरम्यान शाळेत जायची. शाळेत जायला उशीर झाला म्हणून मास्तरांचा मार तिला खावा लागत असे आणि पाण्यात बसलेल्या म्हशी शाळेतून उशीरा आल्यामुळे आजुबाजूच्या शेतात गेल्यामुळे त्या शेतकऱ्यांचा मार चिंधीला मिळत असते. परंतु शिक्षणाची तीव्र इच्छा असलेल्या चिंधीने 4 थी इयत्ता पास झाली. तिच्या वयाच्या 11 व्या वर्षी एका 30 वर्षीय श्रीहरी सपकाळबरोबर तिचे लग्न लावले. चिंधी साठे आता चिंधा श्रीहरी सपकाळ बनली.

वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत तिचे तीन बाळंतपण झाले. तिन्ही मुलं मरण पावली. चिंधा सपकाळ ही 4 बुकं शिकलेली असल्यामुळे तिच्या सासरच्या जमिनीवर कब्जा करू पहाणाऱ्या सावकाराला ती अडसर वाटत असल्याने विसाव्या वर्षी ती गरोदर असतांना तिच्या पोटातलं बाळ हे माझं आहे असं गावात अफवा पसरवल्याने चिंधाला सासरची मंडळींनी तिच्यावर आगपाखंड सुरू केली. पती – सासूकडून गरोदर चिंधीला  मारहाण व्हायची. एके दिवशी चिंधाला जबरदस्त मारहाण करून गुरांच्या गोठ्यात तिला फेकून दिले. ती बेशुध्द अवस्थेत असतांना गुरांच्या गोठ्यात ती बाळंत झाली. तिला मुलगी झाली. शुध्द आल्यावर दगडाने स्वत:च्या हाताने नाळ तोडली. गायींच्या गोठ्यातून 20 वर्षाची ही ओली बाळंतीण आपल्या मुलीला पोटाला बांधून बाहेर पडली. जिथे आसरा मिळेल तिथे तिचं बाळासह वास्तव्य असायचं. भिक मागून कसेबसे पोटाची खळगी भरायची. तथापि 20 वर्षाच्या ह्या तरुणीवर अनेकांच्या वाकड्या नजरा पडायच्या. त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी तिची भटकंती सुरू असायची. रेल्वेत बसून एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जायची. रेल्वेत गाणं म्हटल्याने तिला दोन पैसे मिळायचे. त्यातून स्वत:च्या मुलीच्या पोटाची खळगी भरायची. पुरूषांपासून संरक्षण करण्यासाठी तिने थेट स्मशान भूमीमध्ये रात्र काढायची. पेटत्या चितेवर भाकरी भाजून पोट भरायची. स्मशान भूमी तिच्यासाठी सुरक्षित होती. कारण स्मशानात कुणी गेलेच तर भूत म्हणून तिथून पळ काढायचे.

सिंधूताई सपकाळच्या मनात अनेक वेळा आत्महत्या करण्याचा विचार आला. परंतु प्रत्येक वेळी ती त्यापासून परावृत्त झाली. मरायचं नाही जगायच म्हणून तिची पुढची वाट सुरू झाली. विदर्भाला जवळ खान्देश असल्याने आणि माहेर तसेच सासरमध्ये महानुभाव पंथाचे संस्कार असल्याने त्या फैजपूरला सहा वर्षे राहिल्या. परंतु तिथेही त्यांना त्रास झाला. सिंधूताई सपकाळने पुणे गाठले. दरम्यान रस्त्यात अनाथ मुलगा सापडला. त्या रडणाऱ्या बाळाला घेऊन पुढे निघाल्या. पुढेसुध्दा रस्त्यावर एक बेवारस बाळ दिसलं त्यालाही सोबत घेऊन त्या पुण्यात पोहोचल्या. तिथे स्वत:ची मुलगी आजची माया तिला दगडूशेठ हलवाई यांच्या ट्रस्टकडे सुपूर्द करून सिंधूताई सपकाळ अनाथ मुलाची आई सिंधूताई सपकाळ बनल्या. त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. एक -दोन नव्हे आज सिंधूताई सपकाळ शेकडो अनाथ मुलामुलींचे मायी बनली. 285 माझे जावई आहेत. असे त्या अभिमानाने सांगतात.

एवढा मोठा पसारा, शेकडो अनाथ मुला-मुलींच्या पालन पोषणापासून ते शिक्षणापर्यंतची आर्थिक सोय करणे एवढे सोपे नव्हते. परंतु सिंधूताईला वाचनाची जबरदस्त आवड. निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांनी सिंधुताईंना जीवनाचे तत्वज्ञान शिकविले. त्यांच्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. कवी सुरेश भटाच्या कवितांनी त्यांना बरेच काही शिकविले. त्यांची वक्तृत्व शैली वाखाणण्याजोगी होती. संपूर्ण महाराष्ट्र भर फिरून त्या भाषण देत. हजारोंच्या जनसुमदाय त्यांच्या भाषणाला जमायचा. भाषणातून केलेल्या आवाहनानंतर लोक उत्स्फूर्त आर्थिक मदत देऊ लागले. भाषण केल्यानंतर मला राशन मिळायचे असे त्या खुद्द सांगायच्या. पसारा वाढला. त्यांच्या कार्याचा गौरव झाला. तिच्या सासरी मोठा सत्कार झाला.

सत्कार सोहळ्यात त्यांचे पती श्रीहरी सपकाळ क्रूश नजरेने एकटक पहात होते. त्या पतीला सिंधुताईंनी आपल्या आश्रमात आणले. परंतु पती म्हणून नव्हे तर अनाथ मुलगा म्हणून त्यांचे पालन पोषण केले. सिंधूताईवर ‘ मी सिंधूताई सपकाळ` हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. अमेरिकेत जाऊन तिथेसुध्दा या नऊवारी  साडी नेसलेल्या सिंधूताईंनी मने जिंकली. पद्मश्री किताब केंद्र सरकारने देऊन त्यांचा गौरव केला. एक महिला काय करू शकते हे तिच्या नेत्रदिपक कार्याकडे पहातांना आपण थोडे तरी त्यांचा आदर्श घेऊन तसूभर कार्य करण्याचा प्रयत्न केला तर ती त्यांना खरी श्रध्दांजली अर्पण होईल. माणूस किती दिवस जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला महत्व आहे. अशी ही अनाथाची मायी वयाच्या 75 व्यावर्षी अखेरचा श्‍वास घेतला. सुरूवातीची चिंधी त्यानंतर सिंधू आणि तीच अनाथाची  माय बनली. अशा महान समाजसेविकेस अखेरचा सलाम.

Leave A Reply

Your email address will not be published.