चाळीसगावात शिक्षकाचे बंद घर फोडून १ लाखाचा ऐवज लंपास

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :  शहरात भर दिवसा चोरट्यांनी शिक्षकाचे बंद घर फोडून सुमारे 1 लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली. बंद घरे फोडण्याचा सपाटाच चोरट्यांनी लावल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.हिरापूर रोड, शिवाजी नगर भागात ही घटना घडली.घर बंद करून देव दर्शनाला जाणे या शिक्षक कुटुंबाला चांगलेच महागात पडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिलाल अण्णा पाटील रा. गणेशपुर ह.मु. हिरापूर रोड, शिवाजी नगर, चाळीसगाव हे निपाणी ता. पाचोरा येथे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत.ते कुटुंबासह हिरापूर रोड, चाळीसगाव येथे राहतात. रविवार दि.15 रोजी शाळेला सुटी असल्याने ते गावी गणेशपुर येथे शेतीकामासाठी दुपारी 12 वाजता गेले. घरी त्यांची मुलगी एकटी होती. सायंकाळी 4 वाजता मुलगी तृप्ती ही करजगाव येथील गणपती दर्शनाला जाते असे सांगून घराला कुलूप लावून चावी शेजारच्या डॉ्नटरकाकाकडे देते असे फोनवरून सांगितले. त्यानंतर सायंकाळी 5.45 वाजता मुलगी घरी परत आली असता मुलीने वडिलांना सांगितले की, आपल्या घराचे कुलूप तोडलेले आहे. त्यानंतर हिलाल पाटील यांनी घरी चाळीसगावी धाव घेतली असता घराचे पुढील दरवाजाचे कुलूप तोडून तसेच घरातील कपाटातील लक तोडून कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकून देत कपाटातून 8 ते 10 वर्षापूर्वी विकत घेतलेले 40 हजार रूपये किंमतीचे दोन तोळे वजनाच्या सोन्याचा गोफ, 20 हजार रूपये किंमतीचा एक तोळे वजनाचा नेकलेस, 20 हजार रूपये किंमतीचे एक तोळा वजनाचे कानातील टोंगल(झुमके) व 16 हजार रूपये किंमतीचे 8 ग्रॅम वजानाची गळ्यातील पोत असे एकुण 96 हजार रूपये किंमतीचे दागिणे दि.15च् या सायंकाळी 4 ते सायंकाळी 5.45 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील गोदरेज कपाटाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले चोरून नेले.या दागिण्यांसह पाकीटात ठेवलेले दागिणे खरेदी केलेल्या पावत्याही चोरट्यांनी चोरून नेल्या.याप्रकरणी हिलाल अण्णा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

बंद घरे चोरट्याचे टार्गेट

दरम्यान शहरात दिवसाढवळ्या चोरटे बंद घरे फोडत असल्याने नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेषत: बंद घरे हेरून चोरटे आपला डाव साधून किमती ऐवज चोरून नेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.