चांगदेव ते मुक्ताईनगर

0

सोमवार दिनांक 27 डिसेंबर रोजी चांगदेव ते मुक्ताईनगर 10 कि.मी. अंतर असलेल्या रस्त्यावर रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड. रोहिणी खडसे यांच्या कारवर हल्ला झाल्याच्या वृत्ताने जिल्ह्यात खळबळ उडाली. चांगदेव या गावी एका कार्यकर्त्यांच्या घरी हळदीच्या कार्यक्रमासाठी ॲड. रोहिणी खडसे खेवलकर कारने पोहोचल्या. हळदीच्या कार्यक्रमानंतर काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर रात्री 8.30 चे सुमारास त्या मुक्ताईनगरकडे कारने निघाल्या. कारमध्ये त्यांच्या समवेत त्यांचा पी.ए. होता. कार चांगदेवपासून सुमारे दिड कि.मी.  अंतरावर आली असतांना रस्त्यावर तीन मोटारसायकली आडव्या लावल्यामुळे 6 ते 7 जण समोर येऊन थांबलेल्या गाडीवर लोखंडी रॉड मारून काच फोडली. बोनेटवर रॉड मारली. हा हल्ला करणाऱ्यांजवळ पिस्तुल, तलवार आदी हत्यारेही होते. परंतु रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेतून ड्रायव्हरने कार तेथून काढली आणि कार मुक्ताईनगरकडे सुसाट चालविली म्हणून हल्लेखोरांच्या तावडीतून सहीसलामत सुटका झाली. हे सर्व ॲड. रोहिणी खडसे यांनी  दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

रस्त्यातूनच  ॲड. खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दूरध्वनीवरून कळविले. त्यानंतर मुक्ताईनगरला जाऊन त्यांनी पोलिस स्टेशन गाठून ही फिर्याद दिली होती. दरम्यान या हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात आणि राज्यात पसरली. ॲड. रोहिणी खडसे यांचे वडील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून मुक्ताईनगरकडे रवाना झाले. दुसरे दिवशी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करून या घटनेचा निषेध करून हल्लेखोरांना 24 तासाच्या आत अटक करा अशी जोरदार घोषणाबाजी केली. या हल्ल्यामागे शिवसेनेचा हात असल्याचा संशय स्वत: रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला.

मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांचे नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. हल्याचा निषेध केला. हल्लेखोरांना 24 तासाच्या आत अटक झालीच पाहिजे म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षकांना तसे लेखी निवेदन दिले. कालच्या निदर्शनानंतर पोलिस खात्याने तातडीने दखल घेत 7 जणांवर गुन्हा दाखल केला गेला. अद्याप कोणलाही अटक झालेली नाही. परंतु या हल्ल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकमेकाला अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे.

मुक्ताईनगर ते चांगदेव या 10 कि.मी.च्या अंतरावरील रस्त्यावर आतापर्यंत कधीच कसलाही हल्ला अथवा लूटमार असे प्रकार कधीच घडलेले नाही. मुक्ताईनगर – चांगदेव हा रस्ता या दोन्ही गावासाठी आपला ओळखीचा रस्ता, त्यामुळे या रस्तावर दिवसा – रात्री बिनधास्तपणे लोक दुचाकीने, कारने, सायकलने अथवा पायी येजा करतात. शेतकऱ्यांच्या अथवा पायी येजा करतात. शेतकऱ्यांच्या बैलगाड्यांची वाहतूक सर्रास होत असते. त्यामुळे हा रस्ता कधी  कुणालाही भितीदायक असा नाही. असे या रस्त्यावरून जाणारे  – येणारे सांगतात. त्यामुळे सोमवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास जो हल्ला झाला आणि तोही सिनेस्टाईल त्यावर आमचा विश्वासच बसत नाही असे त्या भागातील रहिवाश्यांचे म्हणणे आहे. बरे ॲड.रोहिणी खडसे यांनी आपल्या कारमधून जात असतांना त्याचे सोबत त्यांचा पीए होता. ड्रायव्हरला असे काही होईल याची पुसटशी कल्पना आली नाही.

आदिवासी भागात घनदाट जंगलात निर्मनुष्य रस्त्यावर असे प्रकार होतात. असा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतु अलिकडे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अशा घटनांनाही पायबंद बसलेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अशा प्रकारचा भ्याड खुनी हल्ला होईल असे कोणालाही वाटणार नाही. त्यातच ज्या मुक्ताई सुतगिरणीच्या रोहिणी खडसे चेअरमन आहेत व ती मुक्ताई सूतगिरणी अवघ्या एक किलो मिटर अंतरावर आहे. त्यामुळे या रस्त्यावर असा हल्ला होवू शकतो या कल्पनेनेच अंगावर शहारे येतात. याचा अर्थ जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात नाही असे म्हणावे काय? त्यामुळे या हल्ल्याच्या संदर्भात पोलिस खात्यानी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. किंबहुना पोलिस खात्यासमोर एकप्रकारचे आव्हानच म्हणावे लागेल. आता पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता याचा तपास करून सत्य बाहेर आणावे लागेल अन्यथा मुक्ताईनगर – चांगदेव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण राहील ती भिती दूर करण्याचे खरे काम पोलिसांचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.