चहार्डीच्या त्या शाळकरी बेपत्ता मुलाचा खूनच

0

शिवाजी नगर भागात सापडले शरीराचे तुकडे; पोलीस गावात ठाण मांडून

चोपडा, दि. 5-
तालुक्यातील चहार्डी येथून बारा वर्षीय शाळकरी मुलगा मंगेश दगडू पाटील हा दि. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान शौच्चास जातो असे आजोबा लोटन रागो पाटील यांना सांगून गेला. तो दि. 3 रोजी संध्याकाळपर्यंत घरी परतलाच नसल्याने गावात एकच खडबळ उडाली होती. याबाबत मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंगळवारी दि. 5 रोजी चहार्डी गावातील शिवाजी नगर प्लॉट भागात त्या मुलाच्या शरीराचे अवशेष व कपडे, चप्पल, शौच्चास बाहेर गेलेला असताना हातातील पाण्याचा डबा सापडल्याने मंगेशचा खुनच झाल्याचे स्पष्ट होत आहे.
मंगळवारी घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असता त्या ठिकाणी मंगेशचा अत्यंत निर्दयीपणे खून केल्याचे उघडकीस आले आहे. तो ज्या ठिकाणी शौचालयला बाहेर पडला होता त्या ठिकाणी त्याच्या हातातील पाण्याचा डबा, त्याची चप्पल व पॅन्ट सापडली असून त्याच ठिकाणी दोन रक्ताने माखलेले अणूकुचीदार दगडही सापडले आहेत.
तर ज्या ठिकाणी रक्ताने माखलेले दगड होते त्यापासून पन्नास फूट अंतरावर नागरटी केलेल्या शेतात मातीत विळा लपवलेल्या अवस्थेत गावकर्‍यांना दिसून आला आहे.
मयत मंगेश हा गावातील कै.श्यामराव शिवराम पाटील माध्यमिक विद्यालयाचा आठवीचा विद्यार्थी असून अतिशय गरीब कुटुंबातील आहे. त्याचे वडील दगडू लोटन पाटील हे गावात हातमजूरी करून पोट भरून आपला संसाराचा गाडा हाकत होते. त्याच्या पश्चात आई , वडील, एक बहीण, आजोबा असा परिवार आहे.
दि. 2 रोजी शनिवारी शाळा सुटल्यानंतर मंगेश घरी आल्यानंतर जेवण करून बारा वाजेच्या सुमारास बाहेर शेतात उघड्यावर शौच्चास बसायला गेलेला असताना आजोबा याना सांगून गेला तर  आई शेजारच्या घरी पापड लाटायला गेली होती. तो गेला तेव्हापासून दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत न परतल्याने त्याचे वडील दगडू पाटील यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दि. 5 रोजी घटनेच्या तिसर्‍या दिवशी शेतकरी भगवान न्हावी यांच्या शेतात पायाचे तुकडे तर कपडे, चप्पल, रक्ताने माखलेले दगड हे चंद्रकात हरी पाटील यांच्या पडीक शेतात सापडले आहे. मयत मंगेश याचे शरीराचे तुकडे सापडले आहेत ही वार्ता गावात वार्‍यासारखी पसरली होती. त्यामुळे एकच गर्दी गावकर्‍यांनी केली.
गरीब व आज्ञाधारक मंगेशचा सर्वत्र शोध
मंगेश हा तसा खूप आज्ञाधारक होता. कुणीही काही काम सागितले तरी तो दुकानावर जाणे, काही वस्तू आणून देणे हे एका शब्दात ऐकत होता. त्याचा घराशेजारी नातेवाईकांनी सर्वत्र चहार्डी येथील शिवाजी नगर मधील लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेतला. मित्राचा मुलगा होता म्हणून मी देखील धरणगाव, जळगाव बस स्टँड, रेल्वे स्टेशन वर पाहण्यासाठी गेलो होते,तसेच नातेवाईकाना फोन लावून विचारपुस केली असल्याचे गावातील राजेंद्र सुखदेव पाटील यांनी दै.लोकशाहीशी बोलताना सांगितले.
भजन कीर्तनाठिकाणीही शोध -मयत मंगेश हा गावात कुठेही कीर्तन भजनाच्या कार्यक्रमात रंगून जायचा. त्याला त्याची खूप आवड होती. म्हणून त्याला ज्या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते त्या गावांमध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला. गावात चहार्डीत सप्ताह व कीर्तनाच्या कार्यक्रमात तो टाळ, घेऊन कीर्तनाला उभा राहत होता अश्या प्रतिक्रिया गावकर्‍यांनी दिल्या. या घटनेच्या तपासासाठी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे एपीआय मनोज पवार, एपीआय योगेश तांदळे, पीएसआय आर. एस. तुरनर, अर्चना करपुळे,
पोलीस कर्मचारी राजु महाजन, संतोष पारधी, विलेश सोनवणे, सुनील कोळी, प्रदीप राजपूत, जयदीप राजपूत यांनी घटनास्थळी जाऊन सापडलेले अवशेष ताब्यात घेतले आहेत.श्वान पथकासह जळगावहुन पीएसआय एस. जे. सोनुले, विनोद चव्हाण, शेषराव राठोड, यांनी आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न करत आहेत.
विहिरीवर सापडले पायांचे तोडलेले लचके
शिवाजी नगर भागातील खासगी विहिरीवर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी गेलेले सरपंच उषाबाई रमेश पाटील यांचा मुलगा दत्तात्रय रमेश पाटील यांना त्या मयत मुलाचे पायाचे लचके त्या विहिरीवर दिसून आल्याने त्याच्याबाबत काही अघटीत घडले का? या शंकेने चहार्डी येथील पोलीस पाटील रोहित रायसिंग यांनी घटनेची माहिती चोपडा शहर पोलिसांना दिली होती. मंगळवारी सहा वाजता घटनस्थळी जळगावहुन श्वानपथक मागविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा तपास सुरु होता.

Leave A Reply

Your email address will not be published.