ग्राम महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

0

खामगाव : गावगाड्याचा कारभारी ठरविण्यासाठी १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल दि. १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. दरम्यान अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत खामगाव तालुक्यात  महाविकास आघाडीने दमदार यश मिळविल्याचे दिसून येते आहे. तर भाजपानेही सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे.

निवडणुक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार खामगाव तालुक्यातील ७१ ग्राम पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर यातील पळशी खुर्द, मांडका, प्रिंप्री कारडे व काळेगाव या चार ग्रामपंचायती अविरोध झाल्या होत्या. उर्वरीत ६७ ग्रामपंचायती मधील ५३० जागांसाठी तब्बल १३०६ उमेदवार रिंगणात उतरले होते.  ग्रामपंचायत निवडणूका ह्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात  नसल्या तरी प्रमुख राजकीय पक्षांचा या निवडणुकांकडे  अप्रत्यक्षरित्या सहभाग असतो. त्यामुळे प्रत्येक गावातील पॅनल हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे पुरस्कृत असते. ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या रणसंग्रामात जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी महाविकास आघाडी व भाजपाचे वरिष्ठ नेते आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी तर ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती.

दरम्यान १५ जानेवारी रोजी तालुक्यातील ६७ ग्राम पंचायतीकरीता मतदार पार पडले. खामगाव तालुक्यात सरासरी ७९ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. आज दि. १८ जानेवारी रोजी येथील नगर परिषद शाळा क्र. ६ मध्ये २५ टेबलवर क्रमवारीने मतमोजणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरूवात होवून दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व ग्राम पंचायतीचे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी  शहरालगतच्या सुटाळा बु. सुटाळा खुर्द, वाडी, शिरजगाव देशमुख, लाखनवाडा, पिंपळगाव राजा, टेंभुर्णा अशा महत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलने विजय मिळविला आहे. तर घाटपुरी, शेलोडी आदि ग्रामपंचातींवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. आज जाहीर झालेल्या निवडणुक निकालावरून खामगाव तालुक्यात काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडी असा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. तर भारतीय जनता पार्टीने सुध्दा ५० टक्के ग्राम पंचायतींवर दावा केला आहे.

मतमोजणी असल्याने तालुक्यातील असंख्य नागरिक, उमेदवारांचे समर्थक येथील न.प.शाळा क्रमांक ६ समोर जमले होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी दिवसभर चाललेल्या या उत्साहा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही व शांततेत मतमोजणी पार पडली. विजयी झालेले उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सुध्दा शांततेने विजयोत्सव साजरा केला. दरम्यान भाजपा समर्थीत पँनलच्या विजयी उमेदवारांचा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी भाजपा कार्यालयामध्ये भाजपाचा दुपट्टा देवून व पेढे भरवून त्यांचे अभिनंदन केले. तर येथील गांधी चौक येथे काँग्रेस जनसंपर्क कार्यालयासमोर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी महाविकास आघाडी समर्थीत पँनलच्या उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी दिवसभर शहरात एकच गर्दी दिसून आली.

Leave A Reply

Your email address will not be published.