गुलाबभाऊ विरूध्द नाथाभाऊ सामना

0

जि.प.अध्यक्ष निवडीचा आखाडा रंगतदार वळणावर

जळगाव (भरत चौधरी) : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड परवा दि.3 जानेवारी रोजी होत आहे. मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील हे आज जिल्ह्यात येत असून दोन दिवसात त्यांना जि.प.च्या निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे. अधिकृतपणे या लढतीची सर्व सुत्रे भाजपाने एकनाथराव खडसे यांच्याकडे दिलेली नसली तरी श्री.खडसे यांनी मात्र, सर्व सुत्र आपल्या हातात घेतली असल्याने जि.प.च्या आखाड्यात परवा पुन्हा एकदा मंत्री गुलाबभाऊ विरूध्द नाथाभाऊ असा सामना रंगणार आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे मंत्री  गुलाबरावांना आघाडीचे नेता म्हणून स्वत:ला  सिध्द करण्याची ही संधी असल्याचे मानले जात आहे. हा सामना जिंकायचाच असा निर्धार ना.गुलाबराव पाटील यांनी केल्याचे संकेत मिळत असून दोन आघाडीच्या दोन सदस्यांच्या अपात्रतेवर स्थिगिती मिळवली असल्याची चर्चा आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 67 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपाचे 33 सदस्य आहेत. काँगे्रसच्या चार सदस्यांच्या मदतीने  आणि राष्ट्रवादीचे आत्माराम कोळी, शिवसेनेच्या सरला कोळी यांना अपात्र ठरल्याने भाजपाने अडीच वर्ष जि.प.त सत्ता उपभोगली. हा चमत्कार भाजपा नेते, तत्कालीन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी घडविला होता. काँग्रेसला एक सभापतीपद देवून त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि पक्षातील भाजपा समर्थकांना सत्तेपासून लांब ठेवले होते. मात्र, आता राजकीय  समिकरण बदलली आहेत.

राज्यात शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादीची महाविकास आघाडी सत्तेवर असून या तिघा पक्षांनी आगामी निवडणूका एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. गुलाबराव पाटील यांना मंत्रीमंडळात बढती मिळाल्यामुळे आता त्यांच्या खांद्यावर महा विकास आघाडीच्या विजयाची जबाबदारी आली आहे. राष्ट्रवादीचे 15, शिवसेनेचे 13 आणि काँग्रेसचे चार सदस्यांची मोठ बांधण्याची जबाबदारी गुलाबरावांवर आली आहे. आत्माराम कोळी आणि सरला कोळी यांच्या अपात्रतेवर गुलाबरावांनी स्थगिती मिळविल्याचो विश्वसनीय वृत्त असून यामुळे जि.प.मध्ये राष्ट्रवादी 16, शिवसेना 14 आणि काँग्रेसचे 4 असे एकूण 34 सदस्य होवून महाविकास आघाडीचे बहुमत दृष्टीपथात दिसत आहे. म्हणूनच हे आव्हान गुलाबराव लिलया पेलतील असे चित्र आहे.

मात्र, बंडखोरीच्या तयारीत असलेले भाजपाने नेते एकनाथराव खडसे अचानकपणे पुन्हा सक्रीय झाले असून जि.प.तील सत्ता भाजपा आणि आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी त्यांनी आता राजकीय चक्रव्यूह रचण्यास प्रारंभ केला आहे. अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणूकीचे सुत्रधार असलेले गिरीश महाजन हे सध्या राजकीय घडामोडींपासून दूर असल्यामुळे नाथाभाऊंना सुट मिळाली आहे.  या दृष्टीने नाथाभाऊंसाठी सुध्दा ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

यामुळेच परवा होणारी निवडणूक चुरशीची बनली आहे. सत्ता कायम राखली तर नाथाभाऊंची पक्षातील प्रतिष्ठा वाढणार आहे. दुसरीकडे परिवर्तन घडविण्यात ना.गुलाबराव यशस्वी ठरले तर जिल्ह्याचे नवे नेतृत्व म्हणून ना.गुलाबराव पाटील यांचा उदय होणार आहे. म्हणूनच परवा होवू घातलेली जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक दोन्ही भाऊंसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

शिवसेनेसह काँग्रेसच्या सदस्यांशी भाजपाचा संपर्क?

गेल्या काही वर्षांपासून भाजपात उपेक्षीत असलेले एकनाथराव  खडसे हे होवू घातलेल्या जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणूकीत पुन्हा सक्रीय झाले आहेत. भाजपाची सर्व सुत्रे त्यांच्याकडे असल्यासारखा त्यांचा वावर असून जि.प.तील भाजपाची सत्ता कायम ठेवण्याची जबाबदारी आपल्यावरच असल्याच्या आर्विभावात नाथाभाऊ राजकीय वक्तव्य आणि डावपेच आखत आहेत. गिरीष महाजन यांची चूप्पी नाथाभाऊंसाठी शक्तीवर्धक ठरत आहे. म्हणूनच महाविकास आघाडी विरूध्द एकनाथराव खडसे असे लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम राखायचीच असा निर्धार केलेल्या नाथाभाऊंनी आता महाविकास आघाडीलाच सुरूंग लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा जि.प.त सुरू होती. काँगे्रसचे चार सदस्यांवर जाळे टाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असून सत्तेतील निम्मा वाटाही या सदस्यांना देण्याचीही तयार भाजपाने केल्याची चर्चा आहे. दुसरा पर्याय म्हणून शिवसेनेच्या सदस्यांपैकी अनेकांशी भाजपाचे पदाधिकारी संपर्क ठेवून आहेत. त्यांचा मन वळविण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. या प्रयत्नात ते किती यशस्वी होतात हे परवाच सिध्द होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.