कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, मूर्तिकारांपुढे वाढविते अडचणी

0

पाचोरा | प्रतिनिधी

गतवर्षी कोरोनाच्या लाटेत गणेश उत्सव आला होता. यामुळे तयार करण्यात आलेल्या मूर्तीची विक्रीच करता आली नाही. यातून जिल्ह्यातील मूर्तिकारांचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान भरून निघणार नाही तोच दुसराही गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात सापडला आहे. यामुळे मूर्तिकारांनी सावध पवित्रा घेत मूर्ती निर्मितीचे काम थांबविले आहे. यातून शेकडो मूर्तिकार आणि कारागीर बेरोजगार होण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या सुमारास कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. याच सुमारास गणेशोत्सव येत आहे. यामुळे तिसरी लाट आल्यास बाजारपेठा पुन्हा बंद पडतील, अशा वेळी तयार झालेल्या गणेशमूर्ती विकायच्या कशा असा प्रश्न मूर्तिकारांपुढे निर्माण झाला आहे. यातूनच मूर्तिकारांनी राज्यभरात चाचपणी सुरू केली आहे. सर्वच ठिकाणी मूर्तिकारांनी मोजक्याच मूर्ती घडविण्याचे काम हाती घेतले आहे. यातून वर्षभराचे नियोजन कोलमडले आहे. दरवर्षी जून-जुलै महिन्यात गणेश मूर्ती निर्मितीचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण होते. यावर्षी गणेशमूर्ती निर्मितीचे काम करणारे कारखाने आणि त्या ठिकाणचे कारागीर यांची संख्या रोडावली आहे. या मूर्तिकारांना परिस्थिती काय येईल याची शाश्वती नाही. याशिवाय तयार झालेल्या मूर्ती विकल्या जातील की नाही, याची हमी नाही. याशिवाय गणेश मंडळ आणि घरगुती भक्तांकडून गणेशमूर्तीची ऑर्डर आलेली नाही. यातून मोठ्या गणेशमूर्ती आणि छोट्या गणेशमूर्ती दोन्हीचे काम रखडले आहे.  गतवर्षीच्या राहिलेल्या मूर्ती सजविल्या जात आहे. याशिवाय काही मोजक्याच मूर्ती घडविल्या जात आहे. शासनाचे धोरण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. संभाव्य काळात निर्बंधाबाबत संदिग्धता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.