कुऱ्हे पानाचे परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  तालुक्यातील कुऱ्हे पानाचे परिसरात बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. मात्र, शुक्रवारी कुऱ्हे पानाचे परिसरात वन्यजीव संरक्षण पथकाने पाहणी केली असता, बिबट्याविषयीचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, तसेच त्या परिसरात आढळलेले पायांचे ठसे बिबट्याचे नसून तरसाचे आहेत, अशी माहिती वनपाल पी एम महाजन यांनी दिली.

शेतशिवारात जामनेर रस्त्यावरील दिनकर बरकले यांच्या शेतात बिबट्यासह दोन बछड्यांना पाहिल्याचे सांगितले होते. त्यांनी ते ‌रात्री पाहिल्याचे सांगितले होते. याबाबत पावलांचे ठसे वन विभागाला पाठ‌विले होते. यासंबंधी शुक्रवारी (दि.२२) रोजी वन्यजीव संरक्षण पथकाने या परिसराची पाहणी केली असता, परिसरात मिळालेले पायाचे ठसे तरसाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वनपाल पी एम महाजन, वनरक्षक एस सी चौधरी व व्ही पी काळे , नरेंद्र बारी या पथकाने शेतात आढळलेल्या पायाचे ठसे बिबट्याचेच आहेत का? हे तपासून बघितले. तसेच त्या भागात बिबट्याचा अधिवास असल्या कारणाने बिबट्या येण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे सांगितले. शेतातील लहान, मोठे ठसे बघता अस्पष्ट असल्याने ते बिबट्या सदृश्य असावे असा अंदाज वर्तवण्यात आला.

परिसरात तरसाचा संचार असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.

शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस काळजी घ्यावी

शेतात जाताना शेतकऱ्यांनी समूह करून शेतात फेर फटका मारावा. हातात आपल्या सुरक्षेसाठी काठी व बॅटरी सोबत घेऊन जावी. शेतात आपल्या जवळपास शेकोटी करावी. शेतात मिरची पावडर चा धूर करावा जेणेकरून त्या धुराच्या वासाने वन्यजीव आपल्या परिसरात येणार नाही. मोबाइलला द्वारे साऊंड स्पीकर वर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचे आवाज वाजवणे. अशा प्रकारे काळजी घ्यावी अशी माहिती यावेळी  वनपाल पी एम महाजन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.