काल पूर्ण चित्र माझ्यासमोर नव्हतं, मात्र, आता… मुंडे प्रकरणावर शरद पवार पुन्हा बोलले

0

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेले बलात्काराचे आरोप व त्यानंतर होत असलेल्या त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली.

‘धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचं स्वरूप गंभीर आहे. त्यांची पक्षानं नोंद घेतलीय, असं काल मी स्वत: बोललो होतो. मात्र, आता वेगळं चित्र पुढं आलं आहे. त्यामुळं या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल,’ असं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे.

‘मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवरच काही लोकांनी आरोप केले आहेत. त्यात माजी आमदार व भाजपचे एक नेतेही आहेत. त्याशिवाय इतरही पक्षांतील लोक आहेत. एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळं आता या प्रकरणाचा वेगळ्या पद्धतीनं विचार व्हायला हवा.

काल मी जेव्हा भूमिका मांडली, तेव्हा पूर्ण चित्र माझ्यासमोर नव्हतं. केवळ महिलेनं मुंडेंवर केलेले आरोप इथपर्यंत ते प्रकरण मर्यादित होतं. त्यामुळंच ते गंभीर आहे असा शब्द मी वापरला होता. आता नवनवीन माहिती पुढं आलीय. त्यामुळं पूर्ण चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणं हा एखाद्यावर अन्याय ठरू शकतो, असं पवार म्हणाले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पथकामध्ये एसीपी स्तरावरील महिला पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असावा, अशी सूचना आम्ही केल्याचंही ते म्हणाले.

मुंडे प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल विचारलं असता, ‘गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी खोलात जाण्याची गरज असते, असं सांगून, पवारांनी अधिक बोलणं टाळलं.

Leave A Reply

Your email address will not be published.