आ.मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव – जळगाव महामार्गावरील फलकांबाबत तक्रार

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :  चाळीसगाव तालुक्यातून जाणाऱ्या जळगाव – चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ जे या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले असून महामार्गाच्या बाजूला गावांची व शहरांची नावे मोडतोड करून (नावाचा अपभ्रंश करून) व सूचना फलक हिंदी भाषेत दर्शविण्यात आलेली होती. याबाबत मराठी एकीकरण समितीचे जितेंद्र कोळी यांनी महामार्ग विभागाकडे तक्रार केली तसेच त्यांनी सदर हिंदी व चुकीच्या फलकांची बाब आमदार मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली होते.

 

त्यानुसार आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग धुळे चे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर जळगाव – चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ जे वरील हिंदीत नाव असलेले व गावाची चुकीची माहिती देणारे फलक बदलविले असून त्याबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग धुळे विभाग यांनी दुरुस्त केलेल्या नावांच्या फलकांचा छायाचित्रांसह अहवाल आमदार मंगेश चव्हाण यांना दिला आहे. मराठी एकीकरण समितीच्या मागणीला आमदार मंगेश चव्हाण यांनी सक्रिय प्रतिसाद देत सदर हिंदी भाषेतील फलक बदल करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समितीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मीडियावर आभार मानले आहेत.

सदर कारवाई मुळे चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील खालील गावांच्या फलकांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

चुकलेले नाव जलगाँव (मुळनाव जळगाव)

चुकलेले नाव चालीसगाव (मुळनाव चाळीसगाव)

चुकलेले नाव पाटोंडा (मुळनाव पातोंडा)

चुकलेले नाव मुंडखेडे (मुळनाव मुंदखेडे)

चुकलेले नाव डाम्रुन (मुळनाव डामरूण)

चुकलेले नाव तांदळवाडी (मुळनाव तांदूळवाडी)

चुकलेले नाव पिंपरि बु (मुळनाव पिंप्री बु)

वडाळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दिशा दाखविणाऱ्या फलकावरील गावाचे नाव वाघळी असे चुकले होते.

काय म्हणतो कायदा ??

आमदार मंगेश चव्हाण यांनी कायद्यावर बोट ठेवत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून झालेली चूक निदर्शनास आणून दिली होती, त्यात त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले होते की, राज्यात मराठी भाषा अनिवार्य असल्याने महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम १९६४ घटनेच्या सातव्या दुरुस्तीने प्रांत रचना कायदा १९५६ अस्तित्वात आला आणि महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य म्हणून अस्तित्वात आलेले असून राज्य शासनाने वेळोवेळी यासंबंधी परिपत्रक काढुन सूचना दिल्या आहेत. सदर बाब ही शासनाच्या लिखित नियमाचे उल्लंघन करणारी असून संबंधितांवर दंडनीय, वेतनवाढ, पदोन्नती वाढ नुसार कारवाई होऊ शकते.

 

आपणास माहीत असेलच की नाव (विशेष नाम) कोणत्याही भाषेत बदलत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या गावाच्या नावात कोणताही अपभ्रंश करू नये. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे फक्त दोन “लिपीत” नावे (फलक) लिहले जावेत ते म्हणजे देवनागरी (मराठी) आणि रोमन (इंग्रजी). कोणत्याही भाषेमुळे आमची “मूळ ओळख असलेल्या नावात’ मोड तोड करू नये अशी विनंती केली होती. तसेच महामार्गावरील सर्व सूचना फलक आणि नाव फलक हे मराठीत करून घ्यावेत व go केलेल्या कार्यवाहीचा दस्त पुरावा म्हणून छायाचित्र उपलब्ध करून द्यावेत अशी सूचनाही त्यांनी महामार्ग विभागाला केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.