आरोग्य प्रशासनाकडून दै. लोकशाहीच्या बातमीची दखल

0

साकळी ता.यावल(वार्ताहर)-  लोकशाही ने दि 8 ऑक्टोबर रोजी साकळीत डासांचा ‘ डंक ‘वाढला! या आशयाखाली वृत्त प्रसारीत केले होते. त्यावृताची दखल घेत  गावात प्रा.आ.केंद्राकडून कंटेनर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर असे की, साकळी येथे गावात सध्या डासांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला असून डासांमुळे अनेक आजार उध्दभवत आहे. आजारी रुग्णांमुळे सध्या प्रा.आरोग्य केंद्रासह गावातील खाजगी दवाखाने सुद्धा फुल्ल झालेले असतांना मलेरिया व टाइफाइड सदृश्य आजारांबरोबरच आता डेंग्यूचा सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. त्यातच कोरोनाच्या आजारामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या चिंतेत अजून भर पडलेली आहे. दरम्यान साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून या समस्येची दखल घेण्यात आलेली असून नागरिकांच्या आरोग्याबाबत  विविध प्रकारच्या उपाय योजना केल्या जात आहे.त्यात आरोग्य प्रशासनाकडून कळविल्यानंतर, दि.९ रोजी साकळी येथे संपूर्ण गावात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण वाढू नये म्हणून वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार  प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत घराघरात कंटेनर सर्वेक्षण सुरू केलेले असून प्रत्येक घरातली पाण्याने भरलेल्या टाक्या, भांडी तपासून त्यात डासांच्या आळ्या आहे किंवा नाही याची तपासणी केली जात आहे. त्यात आज जवळपास दोनशे घरांचे सर्वेक्षण झालेले असून गावातील इंदिरानगर प्लॉट, वाणी गल्ली व व डॉ.आंबेडकर नगर अशा तीनही भागातील जवळपास बारा ते पंधरा घरात डेंग्यू डासांच्या आळ्या आढळून आल्या असल्याचेआरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. जवळपास तीन दिवस हे सर्वेक्षण चालणार असून पुढेही वारंवार सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी नेहमी सतर्क राहून घरातील पाणी साठवण्याबाबत सूचना केल्या जात आहे. तसेच गावात साफसफाई व फवारणी बाबत ग्रामपंचायत प्रशासनाला आरोग्य प्रशासनाकडून पत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील व डॉ.सौ.स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य कर्मचारी कंटेनर सर्वेक्षणच्या कामात सहभाग देत आहे.

… आतातरी ग्रामपंचायतीने फवारणी करावी – प्रा.आ. केंद्राच्या कंटेनर सर्वेक्षण दरम्यान गावातील जवळपास पंधरा घरात डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाकडून गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संपूर्ण गावात लवकरात लवकर डासप्रतिबंध फवारणी करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

●नागरीकांनी सहकार्य करा- गावात डासांमार्फत फैलाव होणाऱ्या आजारांना आळा बसावा म्हणून प्रा.आ.केंद्राकडून घराघरात कंटेनर सर्वेक्षण सुरु केलेले असून पुढील तीन दिवस संपूर्ण गावात सर्वेक्षण केले जाणार आहे. गावातील जवळपास पंधरा घरात डेंग्यू डासांच्या आळ्या आढळून आलेल्या आहे. तरी नागरिकांनी एक दिवस कोरडा पाळून आपणास लागेल तेवढेच पाणी साठवून झाकून ठेवावे. सर्वेक्षणा दरम्यान नागरिकांनी आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.