आधुनिक युगात सायकलवर फिरणारा एकमेव पोलीस दादा राजेंद्र पाटील

0

चोपडा (मिलिंद सोनवणे),लोकशाही न्यूज नेटवर्क

आज कालचे पोलिस म्हटलं की, डोळ्या समोर दिसतो तो आधुनीक काळातील पोलिस. चांगली मोटरसाइकल, गाडी, बंगला, घरातील सर्वच सदस्य ऐश आरामात जीवन जगताना दिसतात.  सर्वांचाच बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की, पोलिस दादा म्हणजे  कायम मजा हजा करणारा, कायम पैसे कमवणारा, घरात सर्वच चैनेच्या वस्तु, दारात महागडी  फोरव्हीलर उभी आणि त्यांचा वेगळाच रुबाब बघायला मिळतो.

पण आधुनिक काळात अपवादात्मक एक आगळा वेगळा साधासुधा, सर्वाना मदत करणारा, सर्वांना न्याय देणारा, आपल्याकडुन कधीही कोणाचे मन दुखणार नाही असा विचार करणारा, कोर्टात असो की चौकात ड्यूटी असो, इमाने ईतबारे आपली ड्यूटी करणारा एकमेव सायकलवाला पोलिस चोपडा शहरात सायकलीवर ये- जा करणाऱ्या पोलिस दादाकडे  लक्ष गेले की,  क्षणासाठी का असेना नजर रोखुन बघितल्या शिवाय कोणीही राहत नाही.

असेच चोपडा शहरात एक राजेंद्र पाटील नामक ए.एस.आय. आहेत. ऊन, वारा, ठंडी, काहीही असो आपली जूनी पुरानी सायकल काढून सतत चोपडा शहरात खाकी वर्दीवर दिसतात. लोकशाहीचे चोपडा प्रतिनिधी मिलिंद सोनवणे यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली असता, असं कळले की, राजेंद्र पाटील हे 1987 साली पोलिस खात्यात रुजु झालेत.  तब्बल 34 वर्ष ड्यूटी बजावत असताना त्यांनी आपली सायकल आजही सोडली नाही.

ते  जळगाव, भुसावळ, एरंडोल, अडावद,चोपडा ग्रामीण, आणि आता चोपडा शहर पोलिस स्टेशनला काम करीत आहेत.रात्रीची गस्त असली तरी पोलिस दादा सायकलवरच सर्व रात्रीची गस्त घालताना दिसतात. कोणत्याही अवैध धंद्यावाल्यांकडुन, सट्टा पत्ता, दारू,आणि जुगार कोणत्याच ठिकाणाहूंन दोन पैसे भेटतील म्हणून कधीही अपेक्षा केली नाही. राजेंद्र पाटील एकमेव पोलिस खात्यातील अपवादात्मक व्यक्ती बघायला मिळतात.

नाहीतर आजच्या आधुनिक काळात पोलिस खात्यातील नवनियुक्त पोलिस असो की जुने सर्वच सदन आणि सर्व सुख सुविधायुक्त ऐशोआरामाचे जीवन जगताना पाहावयास दिसतात. पोलिस म्हटले की., सर्वच सण, उत्सव, दंगली, घरगुती वाद, चोरी, राजकीय सभा, घात अपघात यांची सर्वच जबाबदारी पोलिसांवर असते. यांच्या कुटुंबासाठी कोणताही वेळ ते  देवू शकत नाही ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

तरीही राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या मुलाला देश सेवेसाठी तयार करुन तो आज भारत पाकिस्तान बॉर्डरवर सैनिक म्हणून देशसेवा करतोय.आणि मुलगी ही उच्चविद्याविभूषित आहे. राजेंद्र पाटील म्हणतात की, माझे कुटुंबच माझी कमाई आहे. मला जीवनात कोणत्याही संपत्तीची गरज नाही. दुसऱ्यांच्या कोणत्याही सुख सुविधेविषयी मला कधीही हेवा वाटत नाही. अशा या  पोलिस खात्यातील हटके अशा पोलिस हवलदाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.