आता….महामार्ग NHAI चे काम , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू

0

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव – शहरातून जाणाऱ्या महामार्गातही खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंत चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे.

चौपदरीकरणातून सुटलेल्या कालिंकामाता ते तरसोद व खोटेनगर ते पाळधीपर्यंतच्या टप्प्याची दुरुस्ती सध्या सुरू आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली या टप्प्याचे चौपदरीकरण होत आहे.  हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असून मुळात महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (न्हाई) अखत्यारीत असताना प्रत्येकवेळी या टप्प्यातील दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडे कसे जाते? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

हे दोन टप्पे वंचित

या कामात पाळधीपासून चौपदरी मार्ग बायपास जात असल्याने पाळधी ते खोटेनगर व पुढे कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतचा टप्पा चौपदरीकरणापासून वंचित आहे. त्यामुळे या दोन्ही टप्प्यातील मार्गाची दुरवस्था गेल्या तीन-चार वर्षांपासून कायम आहे.

दर वर्षी दुरुस्ती होतेय

या दोन्ही टप्प्यातील महामार्गाची दरवर्षी दुरुस्ती होते, मात्र तरीही दरवर्षी त्याची दुरवस्था का होते ? हा प्रश्‍नच आहे. आता सध्याही महामार्गावर दोन्ही टप्प्यातील भागाची दुरुस्ती सुरू आहे. खोटेनगर ते पाळधीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून असून कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंत मार्गाची दुरुस्ती सुरू आहे.

साईडपट्ट्यांचे रुंदीकरण

सध्या अस्तित्वात असलेल्या ७ मीटर रुंदीच्या महामार्गालगत दोन्ही बाजूंनी दीड मीटर याप्रमाणे रुंदीकरण सुरू आहे. यात पट्ट्यांवर मुरूम, डब्ल्यूबीएम व नंतर डांबरीकरण केले जाणार आहे. तसेच महामार्गावरील खड्डे बुजून सीलकोट करण्यात येईल. १२ कोटी खर्चाचे हे काम आहे.

राष्ट्रीय महामार्ग नवनिर्माण, देखभाल व दुरुस्तीचे काम ‘न्हाई’कडे असते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील महामार्गाचा हा भाग त्याला अपवाद आहे. चौपदरीकरणात राहिलेल्या या दोन्ही टप्प्यांची दुरुस्ती दरवर्षी १-१२ कोटींचा खर्च प्रस्तावित करून काढली जाते व थातूरमातूर काम होते.

पुन्हा दुसऱ्या वर्षी दुरुस्ती करावीच लागते. विशेष म्हणजे हे काम बांधकाम विभाग करत असून त्यासाठी ‘न्हाई’ने नाहरकत पत्र दिले आहे. असा कार्यक्रम दरवर्षी होतो. मात्र, त्या दर्जाचे काम होत नाही. मग, बांधकाम विभागाकडे या कामापुरता महामार्ग कसा सोपविला जातो? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.