अलिगड विद्यापीठ हिंसाचारप्रकरणी 21 जणांना अटक

0

अलिगड, (उत्तर प्रदेश)  : अलिगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षाबद्दल 21 जणांना अटक करण्यात आली आहे. विद्यापीठातील सर्व वसतीगृहे ताबडतोब रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस आणि विद्यार्थ्यांमधेल हिंसाचार प्रकरणी 21 जणांना अटक करण्यात आली असून 56 जणांच्या विरोधात “एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे, असे अलिगडचे विशेष पोलिस अधिक्षक अक्षय कुल्हारी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दूरध्वनीवरून सांगितले.

सर्व हॉस्टेल रिकामी करण्याचे कडक आदेश मिळाल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना होस्टेलवर राहू दिले जाणार नाही. हॉस्टेलवर राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विशेष बसने त्यांच्या मूळ गावी परत पाठवून देण्यात आले आहे, असे अलिगड मुस्लिम विद्यापिठातील शिस्तपालन अधिकारी अफिफुल्लाह खान यांनी सांगितले.

अलिगड, सहारणपूर आणि मीरत येथेल इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यासाठी अलिगडचा थांबा असणार नाही, असे उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ.पी.सिंह यांनी सांगितले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी जामिया मिलीया इस्लामिया विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या जाळपोळीनंतर अलिगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामध्ये 70 जण जखमी झाले होते.

त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विद्यापिठाने घेतला आहे. अलिगडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.