.. अन्यथा व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

केळीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून व्यापारी रावेर येथील रेट बोर्ड प्रमाणे भाव न देता मनमानी भावाने केळी खरेदी करीत शेतकऱ्यांची लुट करीत आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच शिल्लक राहत नसल्याने तो मेटाकुटीला येवून हताश झाल्याने पाचोरा, भडगाव व सोयगाव तालुक्यातील ५० ते ६० शेतकऱ्यांनी शुक्रवारी आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

व्यापारी बोर्ड रेट प्रमाणे केळी खरेदी करीत नसेल तर त्यांचेवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आमदार किशोर पाटील यांनी केळी खरेदीदार व्यापारी व शेतकऱ्यांमधे चर्चा घडवून आणली मात्र त्यात तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने ते अतिशय आक्रमक पवित्र्यात होते.

केळीचे उत्पादन येई पर्यंत शेतकऱ्यास प्रति झाड ५० ते ६० रुपये खर्च येत असतो. मात्र पाचोरा भडगाव तालुक्यातील व्यापारी केवळ ३०० ते ३५० रुपये क्विंटल दराने केळी खरेदी करत असून शेतकऱ्याच्या हातात वर्ष ते सवा वर्ष राबून प्रति झाडामागे केवळ २ ते ३ रुपये शिल्लक राहत आहे. याशिवाय निसर्गाच्या आलेल्या गारपीट, चक्रीवादळ, अतिवृष्टी यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान होऊनही शासन इतर पिकांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत देत नसल्यामुळे केळी उत्पादन शेतकरी चहू बाजूने भरडला जात आहे.

रावेर येथे ८०० ते १०० रुपये केळी भाव असून व्यापारी रेट बोर्ड प्रमाणे केळी खरेदी न करता मनमानी भावाने खरेदी करत असल्याने रेट बोर्ड नुसार केळी खरेदी सक्तीची असावी. रेट बोर्ड नुसार भाव न दिल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, केळी विक्री व्यवसायात कृत्रिम मंदी तयार करण्यात येत असल्याने यावर आळा घालावा, भडगाव तालुक्यातील गिरणा पट्टा व कजगाव आणि सोयगाव तालुक्यातील किन्ही व पळाशी येथे मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होत असल्याने पूर्वी प्रमाणे कजगाव येथील केळी मालधक्का सुरू करावा, करपा निर्मूलनासाठी शासनाने योग्य मार्गदर्शन व मदत करावी, अतिवृष्टी झालेल्या केळी बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अश्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांना निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

यावेळी सोमनाथ पाटील (बोदर्डे), स्वरूप राजपूत (वडगाव महादेव), विनोद राऊत (नगरदेवळा), दशरथ वाडेकर व आदीकराव वाडेकर (किन्ही ता. सोयगाव), योगेश महाजन (नगरदेवळा), चेतन मराठे, ज्ञानेश्वर पाटील (पथराड), कान्हया जयसिंग, मयूर मणियार, जयसिंग राजपूत, प्रवीण राजपूत, कोमल पाटील, चांद्रसिंग बाबूसिंग पाटील, संदीप बनकर, शंकर पवार, दादासाहेब सपकाळ, विनोद माने, राहुल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चेतन पाटील, किशोर महाजन, आशिष महाजन, सुरेश पाटील सह ५० ते ६० शेतकरी उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी केळी खरेदीदार व्यापारी राम केसवानी, रणजित परदेशी, हर्षल राजपूत यांचेशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

रावेर येथे १००० रुपये केळीचे रेटबॉर्ड

रावेर येथे केळीचे रेटबॉर्ड १००० रुपये असून प्रत्यक्षात व्यापारी ५०० ते ६०० रुपये दराने केळी खरेदी करत आहे. मात्र पाचोरा भडगाव तालुक्यातील व्यापारी केवळ ३०० ते ३५० दराने केळी खरेदी करत असल्याने रावेरच्या व्यापाऱ्यांना ज्यादा भाव देऊन केळी खरेदी करणे परवडते तर येथील व्यापारी केळी उत्पादक शेतकऱ्यांवर का अन्याय करीत आहेत असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.