अखेर उध्दव ठाकरे यांनी `भाकरी फिरवलीच !’   

0
      -योगेश वसंत त्रिवेदी
(yogesh trivedi55@gmail com/9892935321)
    मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱया शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी केली. प्रारंभी अष्टप्रधान मंडळ असलेल्या शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक, मधुकर सरपोतदार, शरद आचार्य, अॅड. लीलाधर डाके, सुभाष देसाई, सतीश प्रधान आणि छगन भुजबळ हे बारा नेते नियुक्त केले. बरीच वर्ष हे बारा नेते शिवसेना प्रमुखांनी कायम ठेवले होते. पण 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यानंतर तसेच वामनराव महाडिक, शरद आचार्य, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे आणि प्रमोद नवलकर यांच्या निधनानंतर शिवसेना नेत्यांमध्ये नारायण राणे, गजानन कीर्तिकर, रामदास कदम, दिवाकर रावते यांची वर्णी शिवसेनेच्या नेतेपदी लागली. 2005 मध्ये राणे यांनी मुख्यमंत्रीपद मिळत नसल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप करीत शिवसेना सोडली. मधल्या काळात उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे आधी युवा नेते आणि मग शिवसेना नेते बनले. राज ठाकरे यांनी  शिवसेनेच्या अधिवेशनात उध्दव ठाकरे यांची कार्याध्यक्ष / कार्यप्रमुख पदावर निवड करण्याचा ठराव मांडला आणि तो सर्वानुमते (ओघानेच) मंजुर झाला.
    2006 मध्ये राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्या बरोबर मतभेद झाल्यामुळे शिवसेनेतून बाजूला होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात बऱयाच नंतर शिवसेनेत उपनेते पद निर्माण करण्यात आले. 1988 च्या सुमारास बाळासाहेबांनी दैनिक `सामना’ची जुळवाजुळव करुन 23 जानेवारी 1989 रोजी दै. `सामना’ हा ‘सामान्यांच्या मनाचा नादनिनाद’, ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक’ सुरु केले. श्री. बाळासाहेब ठाकरे हे `सामना’चे संपादक तर अशोक पडबिद्री हे कार्यकारी संपादक होते. 1991 नंतर अशोक पडबिद्री यांच्या जागी श्री. संजय राऊत यांची कार्यकारी संपादक म्हणून बाळासाहेबांनी नियुक्ती केली. त्यानंतर `दोपहर का सामना’ सुरु झाला आणि श्री. राऊत यांच्या शिफारशीवरुन संजय निरुपम यांची `दोपहर का सामना’ च्या कार्यकारी संपादक पदी नियुक्ती बाळासाहेब ठाकरे यांनी केली. हिंदी, मराठी, आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असल्याने श्री. निरुपम यांची बाळासाहेबांनी राज्यसभेवर पाठवणी केली. पण निरुपम यांना नको ती अवदसा आठवली आणि त्यांनी त्यांच्या उथळ स्वभावाप्रमाणे श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान कार्यालयावर टीका केली आणि प्रमोद महाजन यांनी श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर निरुपम यांची उचलबांगडी करण्यात आली. निरुपम शिवसेना आणि दोपहर का सामना मधून बाहेर फेकले गेले आणि संजय राऊत यांचा राजकीय क्षीतिजावर उदय झाला. 2005 मध्ये राज्यसभेवर निवड झाली तसेच त्यांची थेट शिवसेना नेतेपदी वर्णीही लागली.
    शिवसेनेच्या इतिहासात पहिला केंद्रीय मंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सुरेश प्रभू ! सुरेश प्रभू केंद्रात होते, श्री. अनंत गीते हे केंद्रात मंत्री होते आणि आहेत. श्री. आनंदराव अडसूळ हेही केंद्रात मंत्री होते. चंद्रकांत खैरे यांनी 1990 मध्ये महाराष्ट्र विधानसभा पाहिली. 1995 मध्ये ते राज्याचे गृहनिर्माण मंत्री झाले. 1999 नंतर श्री. खैरे हे लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते आजतागायत लोकसभेवर निवडून जात आहेत. पण एवढे असुनही प्रभू, गीते, अडसूळ, खैरे हे उपनेते म्हणूनच शिवसेनेत होते. सुरेश प्रभू हे शिवसेनेच्या कोट्यातून केंद्रात रेल्वे मंत्री होऊ शकत होते पण मातोश्री च्या नाराजीनंतर नरेंद्र मोदी यांनी 9 नोव्हेंबर 2014 रोजी श्री. प्रभु यांना भाजपच्या कोट्यातून आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिले. शिवसेना सचिव आणि राज्यसभा सदस्य अनिल देसाई सुध्दा केंद्रात मंत्री होत होते. पण त्यांचे दुर्दैव ! देसाई दिल्लीच्या विमानतळावरुनच मुंबईला परतले. अनिल देसाई हे बाळासाहेब ठाकरे यांनी श्री. सुधीर जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघात गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ यांच्या बरोबरीने प्रामाणिक व निष्ठेने काम करीत होते.
    महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात बबनराव घोलप, शशिकांत सुतार, जयप्रकाश मुंदडा, अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड ही ग्रामीण भागातली मंडळी शिवसेनेच्या माध्यमातून होती व आहेत, अशी अनेक बुजूर्ग मंडळी अजुनही अशी आहेत की जी बाळासाहेबांच्या केवळ हाकेसरशी जीवावर उदार होऊन काम करताहेत.
    अरविंद सावंत हा एक कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक. महानगर टेलिफोन निगम असो की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महमंडळातील संघटना असो शिवसेनेचे खणखणीत नाणे म्हणून अरविंद सावंत यांच्याकडे पाहण्यात येते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत श्री. अरविंद सावंत हे लोकसभेवर निवडून आले. पण तेही उपनेते पदापर्यंतच राहिले.
    जून 2017 या महिन्यात शिवसेनेच्या एकावन्नाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने `शिवसेनेत भाकरी फिरविण्याची गरज आहे का?’ या शिर्षकाखाली महत्त्वाचे विचार मांडताना बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर शिवसेनाप्रमुख हे पद अबाधित ठेवून स्वतःची वर्णी त्या पदावर न लावता उध्दव ठाकरे हे पक्षप्रमुख झाले असल्याचं खास कौतुक केले आणि त्याचवेळी काही महत्त्वाचे बदल अपेक्षित केले होते. ही महाराष्ट्रातल्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांची भावना होती. पक्ष वाढवायचा आहे. पण तो वाढवतांना पक्षाला केवळ सूज येऊ न देता तो निष्ठावंतांच्या घामाचे आणि श्रमाचे चीज करुन वाढला पाहिजे ही सर्वांची भावना आहे. जून 2017 नंतर आता शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी 2018 रोजीच्या जयंतीदिनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नव्या नियुक्त्या करताना `भाकरी फिरविल्याचे’ दिसुन आले. अर्थात डॉ. मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोन्ही बुजुर्ग नेत्यांचे नेतेपद कायम ठेवताना युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड होणे हे अपेक्षित होतेच. पण चंद्रकांत खैरे, अनंत गिते, आनंदराव अडसूळ आणि एकनाथ शिंदे यांची नेतेपदी नियुक्ती करुन चांगले पाऊल उध्दव ठाकरे यांनी उचलले आहे. गिते, अडसूळ, खैरे यांचा सन्मान होतानाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना नेतेपदाचा बहुमान दिला हा ठाणे जिल्ह्याचा गौरवच केला.
    शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी मुंबईत जरी आली असली तरी बाळासाहेबांचे ठाण्यावर विशेष प्रेम होते. इतकंच नव्हे तर वसंतराव मराठे हे ठाण्याचे शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष झाले होते. पहिली सत्ता ठाण्यात आली आणि मग मुंबईत आली होती. ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे हे ठाण्याचे दुसरे नेते झाले. सतीश प्रधानांनी ठाण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनविला. ठाणे लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेकडे खेचून आणला. आज ठाणे आणि कल्याण असे दोन खासदार हे शिवसेनेचे आहेत.  आता एकनाथ शिंदे यांनी त्यावर कळस चढवला असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी अशा `मुंबई -नागपूर या समृध्दि महामार्गाचे’ महत्त्वाचे काम एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. ठाणे जिल्हापरिषद पहिल्यांदा शिवसेनेकडे खेचून आणण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. त्याच एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांचे सर्व डाव उधळून ……… रविंद्र फाटक यांना विधान परिषदेपर्यंत नेण्याचे काम केले. पालघर नगरपालिकेवर भगवा फडकवण्यात एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
    उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जसा विश्वास दाखवला तसाच जुने जाणते उपनेते अरविंद सावंत, रविंद्र मिर्लेकर, अनिल राठोड, बबनराव घोलप, विश्वनाथ नेरुरकर, अनंत तरे, सूर्यकांत महाडिक, गुलाबराव पाटील, विशाखा राऊत, मीना कांबळी, सुहास सामंत यांना ही महत्त्वाच्या जबाबदाऱया द्यायला हव्यात. अर्जुन खोतकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चांगली योजना सुरु केली आहे. डॉ. दिपक सावंत यांनी ही बाळासाहेबांच्या नावाने आरोग्य योजना आणली आहे. रवींद्र वायकर, दादा भुसे, अशोक शिंदे यांच्याकडे ही लक्ष देण्याची गरज बोलली जाते. मधुकर सरपोतदार यांचे जुने सहकारी अशोक शिंदे मागे पडले आहेत. विनोद घोसाळकर यांचे पूर्वीचे संघटना कौशल्य माजी शाखाप्रमुख सुरेश काळे, बाबाजी शिंदे, स्वाती शिंदे यांच्या सारख्यांच्या कामाकडे विस्मृती होता कामा नये. नव्यांना झुकते माप देतांना जुने डावलले जाणार नाहीत याची दक्षता नेतृत्व घेईल इतके नेतृत्व सुजाण नक्की आहे. अनेक कार्य करणाऱया पुरुष व महिलांना पदमुक्त करण्यात आले आहे. का? त्यांचा धावता आलेख कुणाला पाहवला नाही? असेही प्रश्न विचारण्यात येतात. बाहेरच्या पक्षातून अलेल्यांना पायघड्या जरुर घाला पण जुन्या निष्ठावंतांच्या पायाखालची सतरंजी तरी खेचू नका, अशा भावना व्यक्त होताहेत. सर्वांना सांभाळून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त होतेय. ग्रामीण भागात काम करणारे पक्ष का सोडून जाताहेत, ग्रामीण भागात काम करणाऱयांवर `संपर्क प्रमुखां’चा कोणता दबदबा आहे?  पक्ष प्रमुखांनी प्रत्येक शाखा प्रमुख, माजी पदाधिकारी, पदमुक्त पदाधिकारी यांच्याशी एकेकट्याने चर्चा केली आणि पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला तर भगवा निश्चित फडकेल आणि हा भगवा निश्चितपणे फडकवतांना भाजपा बरोबरची युती न तोडता सर्वांना विश्वासात घेऊन मार्गक्रमण केले तर ज्या 2014 साली काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपा शिवसेना एकत्र आली आणि देवेंद्र उध्दव यांच्या समन्वयाने सत्ताशकट सुरु आहे तो यापुढेही कायम राहु शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मायकापासून तर शिवशाही वातानुकुलीत बस असो की शिवसेना प्रमुखांच्या नावाने सुरु झालेल्या योजना असो त्यांना हिरवा कंदील दाखविला आहे, या योजना पुर्णस्वरुपात येऊ शकतील. प्रमोद महाजन यांनी शतप्रतिशतचा नारा दिला तरी डिसेंबर 2014 ला देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता राबवलीच ना? तीच गुण्यागोविंदाने स्वतःचा आब राखुन दोघेही पक्ष वाढवून सत्ता सांभाळू शकतात. शिवसेनेचे नेतृत्व कच्च्या कानाचे नक्कीच नाही, सुज्ञ असल्याने अधिक सांगण्याची गरज नाही. शरद पवार यांनी `भाकरी फिरविणे’ हा वाक्प्रचार रुढ केला. उध्दव ठाकरे यांनी भाकरी फिरवायला घेतली आहे. पण दरवेळेला `सामना’ करुन `प्रहार’ करण्याची गरज नाही. खांदा देण्यापेक्षा खांद्याला खांदा भिडवून `सबका साथ सबका विकास’ अंमलात आणलं तर शिवसेना आणि भाजपा या दोघांना `अच्छे दिन’ येतील. 23 जानेवारी 2018 च्या उध्दव ठाकरे यांच्या स्वबळावरच्या घोषणेनंतर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकट्याने लढले तर किती व युति करुन किती जागा येतील याची आकडेवारी समोर आली आहे. त्याचा साकल्याने विचार करुन उध्दव ठाकरे हे संयमी नेतृत्व यशस्वी नेतृत्व देतील यात शंका नाही. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि अभिनंदन!

Leave A Reply

Your email address will not be published.