खामगाव (प्रतिनिधी)-जिल्ह्यासह शहरात कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा वाढत आहे. गर्दी केल्याने, सोशल डिस्टन्स न पाळल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असे वांरवार प्रशासन आवाहन करीत आहे. तर राज्य सरकारने काल 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरी देखील शहरातील विविध भागात नागरिक बंदी झुगारून मुक्तपणे संचार करीत असल्याने संचारबंदीचा आदेश असल्याचे वातावरण कुठेही दिसत नाही.

राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकार ने संचारबंदी घोषित करून अधिक कठोर पावले उचलण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दूध, मेडिकल व हॉस्पिटल, पेट्रोलपंप आदी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवावेत व संचारबंदीचे पालन करावे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच भाजीपाला विक्रेते व किराणा दुकानदार यांनी ठरवून दिलेल्या वेळेत सोशल डीस्टन्ससह नियमांचे पालन करून व्यवहार करावेत असे आदेश दिले असले तरी त्याची पायमल्ली होत आहे.
रस्त्यावर नेहमीप्रमाणे नागरिकांचा मुक्त संचार बघायला मिळत आहे. तर प्रशासनही मुक्त संचार रोखण्यास कुठे प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले नाही. यामुळे सरकारच्या संचारबंदी आदेशाला नागरिकांसह प्रशासनाने खो दिला की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

