७०० लिटर डिझेलची चोरी; ७ संशयितांना अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या स्पेक्ट्रम इलेक्ट्रीक इंडस्ट्रीज कंपनीतून ६५ हजार ८०० रुपये किमतीचे सातशे लिटर डिझेल चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सात संशयित आरोपींना रविवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

एमआयडीसी भागातील उमाळा शिवारात असलेल्या स्पेक्ट्रम एलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत मुख्य कार्यालयाच्या आवारात जनरेटरच्या खोली जवळ ६५ हजार रुपये ८०० रुपये किमतीचे ७०० रुपये लिटर डिझेल चोरल्याचा प्रकार २७ डिसेंबर २०२१ सायंकाळी ७ ते २८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता दरम्यान घडला होता.

याप्रकरणी गजानन लोटन सांगळे (वय ४५, रा. कोल्हे नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखा हे करीत होते. गुन्ह्याचा तपासात तालुक्यातील कंडारी येथील काही मुले डिझेल विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.

त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गफ्फार तडवी, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, सुधीर साळवे, निलाफर सैय्यद सिध्देश्वर डापकर, साईनाथ मुंढे असे पथक कंडारी येथे रविवारी २ जानेवारी रेाजी सायंकाळी ६ वाजता रवाना झाले. या कारवाईत संशयित आरोपी हर्षल भाऊसाहेब बाविस्कर, सुनिल रमेश सोनवणे, तरबेज इब्राहिम पिंजारी, अंकित अनिल निकम, वैभव विनोद चिंचोल, रंजीत किरण परदेशी आणि राम शंकर सुर्यवंशी सर्व रा. कंडारी ता.जि.जळगाव यांना अटक केली.

यावेळी डिझेल चोरी केल्याचे कबुली दिली आहे. चोरीतील १४० लिटर डिझेल पोलीसात जप्त केले आहे. सातही संशयित आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here