मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी ४८ दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल १७ ते १८ पैसे आणि डिझेल दरात २२ ते २५ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रती लीटर ८७.९२ रुपये आणि डिझेल ७७.११ रुपये झाले आहे.
आज देशभरात पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली आहे. त्यामुळे दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.२३ रुपये असून डिझेल ७०.६८ रुपये आहे. याआधी मागील ४८ दिवस दिल्लीत पेट्रोल ८१.०६ रुपये आणि डिझेल ७०.४६ रुपयांवर होते. चेन्नईत पेट्रोल ८४.३१ रुपये असून डिझेल ७६.१७ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.७९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.२४ रुपये प्रती लीटर झाले आहे.
अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच करोना प्रतिबंधात्मक लशीबाबत सकारात्मक घडामोडी घडत असल्याने तेल उत्पादन देशांच्या संघटनेने तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.गेला आठवडाभर कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत. आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सलग दुसऱ्या दिवशी घसरले आहेत. अमेरिकेत करोनाचा पुन्हा फैलाव वाढला असून न्यूयॉर्कमध्ये पुन्हा लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव ०.२ टक्क्यांनी घसरला. वेस्ट टेक्सास मध्ये तेलाच भाव ९ सेंट्सने घसरून ४१.६५ डॉलर झाला.