जळगाव : दोनच दिवसांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या २० वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना पाळधी येथे घडली. आरती विजय भोसले (२०, रा. पाळधी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि मित्रांना ताब्यात घेतले आहे. विवाहितेच्या माहेरच्यांनी तिचा पती, त्याचे मित्र व सासरच्या लोकांवर आरोप करीत शासकीय रुग्णालयात संताप व्यक्त केला. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही,असा पावित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पाळधी येथील आरती भोसले ही तरूणी ६ डिसेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता झाली होती. त्यामुळे आरतीच्या कुटुंबियांनी पाळधी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. पोलिसांसह कुटुंबियांकडून तिचा शोध सुरू असतानाच, २९ डिसेंबर रोजी आरती पाळधी गावातीलच प्रशांत विजयसिंग पाटील या तरूणासोबत विवाह करून परतली. आरती व प्रशांत मंगळवारी पाळधी पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांना प्रेमविवाह केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. दोन्ही कुटुंबियांची संमती मिळाल्यानंतर आरती त्याच दिवशी पती प्रशांतसोबत पाळधी येथील प्रशांतच्या घरी अर्थात सासरी गेली.
दोनच दिवसात संशयास्पद मृत्यू
आरती हिला सासरी जाऊन अवघे दोन दिवस झाले होते. त्यानतंर शुक्रवारी सकाळी आरतीचा पती प्रशांत याचा मित्र आरतीच्या माहेरी आला. आरतीचा मृत्यू झाल्याचे त्याने आईला सांगितले. त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरतीच्या काकूही घटनास्थळी आली. त्यावेळी आरतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.