नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ५०८ नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील करोना बाधितांची संख्या ५७ लाख ३२ हजार ५१९ इतकी झाली असून, २४ तासांत १,१२९ जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दर १.५९ टक्क्य़ांपर्यंत कमी झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात ९ लाख ६६ हजार ३८२ जणांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या ४६ लाख ७४ हजार ९८८ इतकी झाली आहे. याच वेळी, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.२५ टक्के इतके झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ६ कोटी ७४ लाख ३६ हजार ३१ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर बुधवारी ११ लाख ५६ हजार ५६९ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.