नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवल्याची माहिती समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एक नोटही छापली नाही. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयनं ही माहिती दिली.
केंद्र सरकारनं २०१६मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पहिल्यांदाच २००० रुपयांची नोट चलनात आणली. काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली. त्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. यावरून केंद्र सरकार आणि आरबीआयवर टीकाही झाली. जाणकारांच्या मतांनुसार, जास्त मूल्याच्या या नोटेमुळं पुन्हा काळा पैसा वाढेल. याशिवाय २००० रुपयांच्या नोटेमुळं सुट्ट्या पैशांची समस्याही वाढेल, असंही त्यांनी सांगितलं होतं.