१६ मे नंतर देशात करोनाचा एकही रुग्ण आढळणार नाही?

0

नवी दिल्ली : जगभरासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्शवभूमीवर देशभरात लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने करोनाच्या संसर्गाचा वेग मंदावला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी झाले असून, ते आता दहा दिवसांवर गेले आहे. त्यामुळे सध्या जरी देशात रुग्णसंख्या वाढत असली, तरी १६ मेनंतर देशात एकही करोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी एका अभ्यासाद्वारे मांडले आहे.

पॉल यांनी नुकतेच त्याचे सादरीकरण केले. राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्थेच्या संशोधकांसह जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) काही प्रतिनिधींनी मांडलेल्या अभ्यासाद्वारे हा निष्कर्ष समोर आला आहे. यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या अभ्यासानुसार, तीन मेपासून रुग्णसंख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होईल. कदाचित दीड हजार रुग्ण रोज वाढतील. १२ मे रोजी ही संख्या एक हजारपर्यंत खाली येईल आणि १६ मेनंतर एकही नवा रुग्ण आढळणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. ‘गुजरात, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र यासारख्या करोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या राज्यांमधील रुग्णसंख्या जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय सरासरी कमी होणार नाही, हेही तितकेच सत्य आहे. आम्ही त्यासाठी अधिकाधिक आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आदी साहित्याची तरतूद करत आहोत,’ असे पॉल यांच्या समितीतील एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.