होम आयसोलेशनची नवी नियमावली जारी, काय सांगितलं आरोग्य मंत्रालयानं?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवसेंदिवस कोरोना वाढतच आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच अनेक नियम बदलणार आहे. होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वात बदल केला असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ते जारी केले आहेत. आरोग्य मंत्रालयानं सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केलीत. सात दिवस पॉझिटिव्ह राहिल्यानंतर आणि तीन दिवस ताप नसेल तर रुग्णाला होम आयसोलेशनच्या नवीन नियमांनुसार डिस्चार्ज दिला जाईल आणि अलगीकरण संपेल, असं मंत्रालयानं म्हटलंय.

आरोग्य मंत्रालयानं म्हटलं, की होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही. आकडेवारीनुसार, गेल्या 9 दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 6 पटीनं वाढलीय. ओमिक्रॉन व्हेरिएन्टच्या केसेस तीन दिवसांत दुप्पट होत आहेत. लोकांनी रुग्णालयाकडे कमी वळावं. यासाठी नवीन होम आयसोलेशन गाइडलाइन आवश्यक आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या डेल्टा प्रकारामुळे जेवढा विद्ध्वंस झाला नाही तेवढा विद्ध्वंस भारतात होण्याच्या शक्यतेनं आरोग्य मंत्रालय चिंतित आहे. अशा परिस्थितीत ओमिक्रॉन भारतात कसा असेल, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

भारतात कोमॉर्बिड रूग्णांची संख्या (जे आधीच काही आजाराशी झुंज देत आहेत) लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही वाढेल. होम आयसोलेशनच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी, राज्यांना नियंत्रण कक्ष व्यवस्थित ठेवण्यास सांगितलंय. नियंत्रण कक्षाचं काम असं असेल, की याद्वारे राज्ये योग्य प्रकारे देखरेख ठेवू शकतील आणि जेव्हा रुग्णाची तब्येत बिघडते आणि त्याला होम आयसोलेशनमधून रुग्णालयात दाखल करावं लागतं, अशा स्थितीत रुग्णवाहिकेपासून ते रुग्णालयातल्या खाटांपर्यंत सर्वच बाबी करणं सहज शक्य होतं.

होम आयसोलेशनचे नवीन नियम

वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनची परवानगी दिली जाईल. सौम्य लक्षणं असलेले रुग्ण घरीच राहतील. यासाठी योग्य व्हेंटिलेशन असणं आवश्यक आहे. रुग्णाला ट्रिपल लेयर मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आलाय. याशिवाय रुग्णाला जास्तीत जास्त द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्याचवेळी एचआयव्ही बाधित किंवा प्रत्यारोपण झालेल्या आणि कर्करोगाच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशनमध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल.

लक्षणे नसलेले आणि सौम्य-लक्षण नसलेले रुग्ण ज्यांची ऑक्सिजन पातळी 93%पेक्षा जास्त आहे, त्यांना होम आयसोलेशनमध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल. जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाला होम आयसोलेशनमध्ये असलेल्या सौम्य आणि लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या सतत संपर्कात राहावं लागेल. नियंत्रण कक्ष त्यांना आवश्यक असल्यास वेळेवर चाचणी आणि रुग्णालयातले बेड प्रदान करण्यास सक्षम असेल. रुग्णाला स्टेरॉइड्स घेण्यास मनाई आहे. तसेच सीटी स्कॅन आणि छातीचा एक्स-रे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here