लोकशिक्षा विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात विचारमंथन जळगाव :- पुणे- मुंबईसारख्या मोठ्या शहरात होमस्कुलींग करणारे गृप तयार झालेले आहेत. मुलांना शाळेत न पाठवता शाळेसारखा अभ्यास घरी नेटचा आधार घेवून आणि गृपमध्ये विद्यार्थ्यांना दहावी पर्यंतचे शिक्षण दिले जात आहे. याबाबत मी एक संस्थाचालक म्हणून माझ्याकडे पालकांकडून विचारणा केली जात आहे. त्या अनुषंगाने याचा आता विचार करण्याची वेळ आली आहे. दैनिक लोकशाहीच्या लोकशिक्षा विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ही चर्चा पुढे जावून हा विचार रुढ व्हायला हवा. सध्या रुढ असलेली शिक्षणपद्धती ही साचेबद्ध आहे. ही शिक्षणपद्धती बदल स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे सध्या शाळा ओस पडल्या आहेत. त्यासाठी शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल आवश्यक असून होम स्कूलसारखी परिणामकारक शिक्षणपद्धती हवी. आजची पिढी ही प्रगल्भ आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना तारांबळ उडते आहे. दर्जेदार शिक्षण मिळविण्यासाठी महागड्या संस्थांनाही पसंती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकशिक्षा विशेषांकाचे थाटात प्रकाशन
दहावी बारावीच्या निकालानंतर संभ्रमावस्थेत असलेल्या पालकांना सार्थ सल्ला व मार्गदर्शक ठरणार्या दै. लोकशाहीच्या वतीने लोकशिक्षा या विशेषांकाचे थाटात प्रकाशन लोकलाईव्ह स्टुडियोत मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी संध्याकाळी करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांच्यासह आशा फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया, आयएनआयएफडीच्या संचालिका संगीता पाटील, दर्जी फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाल दर्जी आदी उपस्थित होते.
नावीन्याचा ध्यास असलेला लोकशाही समूह
लोकशिक्षा विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित मान्यवरानी लोकशाही समूहावर स्तुतीसुमने उधळली. महावीर क्लासेसचे नंदलाल गादीया सर म्हणाले की, सतत नाविन्याचा ध्यास असलेला लोकशाही समूह आहे. छोट्याशा रोपट्यातून आज वटवृक्षाकडे वाटचाल सुरु आहे. प्रिंट माध्यमातून डीजीटल माध्यमात लोकशाहीचा प्रवेश अभिमानास्पद आहे तर मेट्रो शहरे व खान्देश यात तफावत आहे.मात्र लोकलाईव्हच्या माध्यमातून मोठ्या शहरातही पोहोचता येते, असे मत आयएनआयएफडीच्या संचालिका संगीता पाटील यांनी व्यक्त केले. जून महिना हा शाळा कॉलेज प्रवेशाचा असल्याने त्यावेळी हा विशेषांक माहितीपुर्ण आहे. लोकशाहीकडून दरवर्षी नवीन विषय हाताळले जातात जिल्ह्याभरातील लेख असल्यामुळे प्रसार, प्रचार चांगला असल्याचे मत दिशा फाऊंडेशनचे गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. लोकशाही समुहाचे प्रेरणादायी काम आहे. संस्थेला 90 टक्के सामाजिक भान असल्याचा गौरव दर्जी फाऊंडेशनचे संचालक गोपाल दर्जी यांनी केला.
सुरवातीला लोकशाहीचे संचालक राजेश यावलकर यांनी दै. लोकशाहीच्या वाटचाली संदर्भात प्रकाशझोत टाकला. सल्लगार संपादक धों. ज. गुरव यांनी लोकशिक्षा या विशेषांकाविषयी माहिती दिली. दै. लोकशाहीच्या संपादिका सौ. शांताताई वाणी यांनी दै. लोकशाही कसा सुरु झाला आणि आता डिजिटल माध्यमातही पाऊल टाकले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.