होमगार्डच्या मुलीच्या लग्नासाठी सरसावली ” खाकी “

0

आर्थिक सहकार्य करून घडवले माणुसकीचे दर्शन

भुसावळ :-  केवळ गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून पोलिसांची  ओळख असते, या पोलिसांची जरब व धाक बहुतांशी सामान्य नागरिकांवर सुद्धा असते पोलिसांना सहकार्य वा मदत मागण्यास अनेकांना भीती वाटते .अश्या परिस्थितीत मात्र शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी अत्त्यंत कौतुकास्पद कार्य करून “खाकी मध्ये सुद्धा माणूस दडला असल्याची जाणीव शहराला करून दिली. औचित्य होते ते एका होमगार्डच्या मुलीच्या लग्नाचे … येथील कंडारी येथील रहिवाशी व होमगार्ड मध्ये कार्यरत असलेले राजेश बिल्लोरे यांच्या मुलीचे लग्न येत्या १४ मे २०१९ रोजी करण्याचे ठरले आहे . लग्न तिथी जसजशी जवळ येत आहे तसे राजेश बिल्लोरे यांना चिंतेने ग्रासले . अत्यंत गरिबीची परिस्थिती असलेले बिल्लोरे यांना होमगार्ड मध्ये ड्युटी बजावतांना  मिळणारे  मानधन अत्यल्प स्वरूपाचे असते . त्यात हे मानधन कधी मिळते तर कधी चार पाच महिने उलटून देखील मिळत नाही.

याकरिता ते होमगार्ड बंदोबस्त नसला की हातमजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात . त्यात बिल्लोरे यांच्या मुलीचे लग्न जमले लग्नाची तारीख जवळ आली मात्र पैशांची जुळवाजुळव काही केल्या होत नव्हती . हतबल व ट्रस्ट झालेल्या राजेश बिल्लोरे यांनी आपली व्यथा पोलीस कर्मचारी बांधवाना सांगितली . राजेशची गरीब व दयनीय अवस्था बघून व त्याच्या परिस्थितीची जाणीव पोलीस विभागाला झाली.

दरम्यान पोलीस कर्मचा-यांनी आपल्या अधिका-यांना या गोष्टीची माहिती दिली . आणि शहरातील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे , बाजारपेठचे पोलीस निरीक्षक देविदास पवार , पो नि रामकृष्ण कुंभार , वाहतूक शाखेचे पो नि दिपक  गांधेले यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी पुढाकार घेऊन निधी जमा केला . आणि होमगार्ड राजेश बिल्लोरे यांना जमा झालेला निधी सुपूर्द केला . मुलीच्या लग्नाकरिता खाकी ने पुढाकार घेतला व अत्यंत कौतुकास्पद कार्य करीत माणुसकीचे दर्शन घडविले याबद्दल शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान होमगार्ड राजेश बिल्लोरे यांना पोलीस विभागाने केलेल्या सहकार्याचा अतिशय सुखद दिलासा मिळाला व त्यांनी मला देवच भेटल्याची भावना व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.