हॉकर्स, भाजीपाला, फळे विक्रेत्यांनी मास्क, रुमाल वापरावा!*

0
*महापौर भारती सोनवणे यांचे आवाहन : नागरिकांनी गर्दी करू नये*
जळगाव, दि.२० – कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. बाजारात जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे हॉकर्स, भाजीपाला, फळ विक्रेते यांचा नागरिकांशी मोठ्याप्रमाणात संपर्क येतो. त्यामुळे त्यांनी विशेष करून तोंडाला रुमाल किंवा मास्क लावावा तसेच शक्य असल्यास सॅनिटायझरचा उपयोग करावा, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.
शहरात अद्यापपर्यंत कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळून आला नसला तरी शहरात बाहेरून येणाऱ्यांची आणि विशेषतः रोजच्या कामासाठी उपडाऊन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे.
*शनिवारच्या बाजारात गर्दी टाळा*
उद्या शनिवारी जळगावच्या बळीरामपेठ, सुभाष चौक परिसरात मोठा बाजार भरतो. बाजारात भाजीपाला, फळे विक्री करणारे तसेच शहरात फिरणारे हॉकर्स यांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावावा. शक्य असल्यास सॅनिटायझरचा देखील उपयोग करावा. नागरिकांनी बाजाराचा दिवस असल्याने गर्दी करू नये असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.
*जनता कर्फ्यूत सहभागी व्हा*
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनापासून लढा देण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जळगावकर नागरिकांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनता कर्फ्यूचे पालन करावे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, कोणत्याही ठिकाणी गर्दी करून उभे राहू नये असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.