जळगाव | प्रतिनिधी
स्नेहल पवार यांच्या तीन दिवसाच्या मुलाला अशक्तपणा, कमी आहार आणि त्वचेचा रंग निळसर पडल्यामुळे जळगावमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या स्थैर्यानंतर डॉक्टरांना हृदयरोग असल्याचा संशय आला व इकोकार्डिओग्राम काढल्यानंतर ते निश्चित झाले. रुग्णाला एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, मुंबई येथे नेण्याची शिफारस करण्यात आली व तातडीने तिथे हृदयरोग उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ सल्लागार बालरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रतीम सेन यांनी बाळाला तपासले आणि पालकांना पीडीए स्टेंटिंग नावाचे उपचार तातडीने करावे लागणार असल्याची गरज समजावून दिली. पल्मॉनरी अट्रेशिया, व्हीएसडी हा गंभीर सायनोटिक हृदय दोष असून त्यावर जन्मानंतर पहिल्या काही दिवसांतच उपचार करणे आवश्यक असते. या आजारात हृदय आणि फुप्फुसांतील रक्तवाहिन्यांमधे एरवी असणारे बंध जुळलेले नसतात. जन्माच्या वेळेस फुप्फुसांतील रक्तवाहिन्यांना पीडीए नावाचे लहान व्हेसल पुरवले जाते जे सामान्यतः जन्मानंतर पहिल्या आठवड्यात बंद होते. पल्मॉनरी अट्रेशिया असलेल्या रुग्णांमध्ये बाळाचा जीव वाचवण्यासाठी पीडीए बंद होण्याआधी आपत्कालीन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. बाळाला अतिदक्षता विभागात हवेशीर पद्धतीने स्थिर करण्यात आले व काही तासांनंतर कार्डिअक कॅथेटरायझेशन प्रयोगशाळेत पीडीए स्टेंटिगसाठी नेण्यात आले.
खास हायब्रीड पद्धतीने पीडीए स्टेंटिंग करण्यात आले, ज्यामध्ये वरिष्ठ सल्लागार बालरोगतज्ज्ञ हृदयरोगतज्ज्ञ शल्यविशारद डॉ. प्रदीप कौशिक यांनी मानेतून व्हस्क्युलर अक्सेस दिला व त्यानंतर डॉ. सेन आणि त्यांच्या सहकारी प्रिया प्रधान यांनी पीडीए स्टेंटिंगची प्रक्रिया पूर्ण केली. ही प्रक्रिया एक तास चालली आणि स्टेंट बसवल्यानंतर बाळाची ऑक्सिजन पातळी ५० टक्क्यांवरून ८५ टक्क्यांवर गेली. बाळाला पुढचे चार दिवस बालरोग हृदयरोग अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले व सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि बाळाचे आरोग्य स्थिर झाल्यावर सात दिवसानंतर घरी सोडण्यात आले. पीडीए स्टेंटिंग ही सर्वात आव्हानात्मक आणि भरपूर जोखीम असलेली नवजात बाळावरची हृदयशस्त्रक्रिया आहे,’ असे डॉ. सेन म्हणाले. ही नवी हायब्रीड शस्त्रक्रिया आमच्या बालरोग हृदयरोग तज्ज्ञांच्या टीमने प्रमाणित केली असून यामुळे प्रक्रिया जास्त सुरक्षित व जलद झाली आहे. आम्ही आतापर्यंत चार रुग्णांमध्ये यशस्वीपणे ही हायब्रीड पद्धत वापरली असून सर्व रुग्णांमध्ये उत्तम परिणाम मिळाले आहेत. पल्मॉनरी अट्रेशिया, व्हीएसडी हा गुंतागुंतीचा सायनोटिक हृदय दोष आहे. अशा रुग्णांमध्ये नवजात अवस्थेतच पीडीए स्टेंटिंग केले जाते आणि नंतर सहा महिने किंवा एका वर्षानंतर करेक्टिव्ह शस्त्रक्रिया केली जाते. हे रुग्ण दाखल केले जातात, तेव्हा गंभीर अवस्थेत असले, तरी वेळेवर उपचार केल्यास दीर्घकालीन यश मिळते, असे डॉ. प्रदीप कौशिक म्हणाले. एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सची वैविध्यपूर्ण टीम अशा गंभीर हृदयरोग असलेल्या बाळांवर उपचार करते व त्यात बालरोग, हृदयरोग भूलतज्ज्ञ, वैभव ढाबे आणि डॉ. लोपामुद्रा माझी आणि बालरोग हृदयरोग इंटेन्सिव्हिस्ट डॉ. विनय जोशी यांचा समावेश आहे. बाळ आता आईकडे परत गेले असून त्याची प्रकृती स्थइर आहे. शिफारस केलेल्या डॉक्टर्समधील सहकार्य व सांघिक कामगिरीमुळे तसेच मुंबईतील डॉक्टर्सच्या टीममुळे या बाळाचे आयुष्य वाचवण्यात मोलाची मदत झाली.