हायवेंना लागून असलेले पेट्रोल पंप विक्रीसाठी आधीप्रमाणे खुले राहणार

0

जळगाव । जिल्ह्यातून जाणार्‍या हायवेंना लागून असणारे पेट्रोल पंप आधीप्रमाणे खुले राहणार असून पेट्रोल/डिझेल विक्री करता येणार आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी रात्री उशीरा  लेखी आदेश जारी केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यातील पेट्रोल पंपसाठी सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी चार ते सात ही वेळ जाहीर करण्यात आली होती. यात अत्यावश्यक सेवांसाठी आणि ते देखील शासकीय पास असेल तरच पेट्रोल वा डिझेल दिले जात होते. आता लॉकडाऊनसाठी राज्य शासनाने नवीन निर्देश जारी केले आहेत. यानुसार जिल्हा प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांसाठी आधीची अट शिथील केली आहे. याच्या अंतर्गत जिल्ह्यातून जाणार्‍या हायवेंना लागून असणार्‍या पेट्रोल व डिझेल पंपमध्ये आधीप्रमाणे पेट्रोल/डिझेल विक्री करता येणार आहे. अर्थात, फक्त मालवाहतूक करणार्‍या वाहनांनाच इंधन मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर महापालिका व नगरपालिका हद्दीपासून तीन किलोमीटरच्या आत असणार्‍या पेट्रोल पंपांना यातून वगळण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबतचे लेखी निर्देश जारी केले आहेत.

या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ म्हणजेच पारोळा ते मुक्ताईनगर; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-जे जळगाव ते पाचोरा-चाळीसगाव-नांदगाव मार्ग; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-एफ जळगाव ते पहूर-सिल्लोड-औरंगाबाद; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-एल म्हणजे पहूर-जामनेर-बोदवड-मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर आदी मार्गांवरील पेट्रोल पंप आता आजपासून नियमित वेळेप्रमाणे खुले राहणार आहेत. यात वर नमूद केल्यानुसार शहरांच्या हद्दीपासून तीन किलोमीटरच्या आतील पेट्रोल पंपांचा अपवाद असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.