भावपुष्पांजली सभेत मान्यवरांचा सूर
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील उद्योजक, गोसेवक, शाकाहार प्रणेते दानशूर व्यक्तिमत्व रतनलाल सी. बाफना यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा क्षेत्रातील विकासासाठी भरीव असे अविस्मरणीय योगदान दिले, असा सूर आज जळगावात आयोजित भावपुष्पांजली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला . स्व . रतनलाल सी. बाफना यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दृकश्राव्य संदेशाद्वारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील म्हणाल्या की, माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचे आहे. वंचित, शोषित, गरीब लोकांचे ते कैवारी होते. सेवाभावी वृत्ती त्यांच्यात होती. माजी मंत्री सुरेशदादा जैन दृकश्राव्य संदेशाद्वारे म्हणाले की, बाफनाजी यांना निश्चितच सुंदर आयुष्य लाभले. सामाजिक बांधिलकी जोपासून त्यांनी जळगावचे नावलौकिक केले, अशा भावना व्यक्त केल्या.
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, बाफनाजी महान व्यक्तिमत्व होते. त्यांना जेव्हा भेटलो, तेव्हा त्यांचा आशीर्वादच मिळाला, अशी भावना मांडली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले की, समाजसेवेचा सच्चा माणूस हरपला तर महापौर भारती सोनवणे यांनी, शहराच्या विकासात बाफनाजी यांनी महत्वाचा वाटा उचलला असे सांगून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी बाफनाजींच्या आठवणी उजागर करीत, त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळाले असे त्यांनी सांगितले. त्यांची जागा भरून काढणे कठीण आहे. सुवर्ण पिंपळाचे पान गळाले आहे.कस्तुरचंद बाफना यांनी सांगितले की, समर्पित आणि निर्व्यसनी जीवन ते जगले. भेटणाऱ्या व्यक्तींना जर ते मांसाहारी असतील तर, त्यांना शाकाहाराचे महत्व पटवून दिले. जळगाववासीयांचे उपकार बाफना परिवार सदैव लक्षात ठेवेल, असेही ते म्हणाले. माजी प्राचार्य अनिल राव यांनी क्षुधाशांती सेवा केंद्र विषयीच्या आठवणी जागृत केल्या.
याप्रसंगी माजी आमदार मनीष जैन, रंगकर्मी शंभु पाटील, व्यापारी युसूफ मकरा,ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, डी.डी. बच्छाव, मल्टिमीडिया फीचर्सचे सुशील नवाल, नवजीवन सुपर शॉपचे अनिल कांकरिया, व्यापारी प्रेम कोगटा, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, अभिषेक बाफना, यांनीही श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन प्रा. यजुवेंद्र महाजन यांनी केले.तर आभार सुशील नवाल यांनी मानले.