पाचोरा | प्रतिनिधी
तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटप करणेसाठी अभिनव कल्पना अंमलात आणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा अभिनव उपक्रम देशाला घालून दिला आहे.
सुरेखा महाले यांनी आपल्या दुकानात स्वस्त धान्य वाटप करण्यासाठी एक मोठे नरसाळे आणि स्वतंत्र पाईप ठेवले आहे. लाभार्थी दुकानात आल्यावर दुकानदार ई-पॅास मशिनद्वारे स्वत:चे आधार आधिप्रमाणित करून लाभार्थ्यासमोर धान्य मोजतात. त्यानंतर लाभार्थ्यास पाईपच्या दुस-या टोकास पिशवी लावणेस सांगितले जाते. लाभार्थीनी पाईपच्या दुस-या टोकास पिशवी लावल्यानंतर त्या दुकानातून मोठ्या नरसाळ्यातून धान्य सोडतात. हे धान्य नरसाळ्यातून आपोआप लाभार्थीच्या पिशवीत पडते. यामुळे सोशल डिस्टेंन्शिंग होत असुन लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी ५ फुट अंतरावर चौकोन तयार करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी रांगेत या चौकोनातच उभे राहण्याच्या सूचनाही त्या सर्वांना देतात. जळगाव जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाचे स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुरवठा विभागास धान्य वाटप करतांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी या निर्णयाची जिल्हाभर काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना स्वस्त धान्य दुकानदार यांना दिल्या. त्यानुसार मीच माझा रक्षक माणून सुरेखा महाले यांनी आपली, आपल्या कुटूंबाची व ग्राहकांची सुरक्षितता ओळखून हा उपक्रम राबविण्याचा निश्चय केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत माहे एप्रिल २०२० चे धान्य वाटप सुरू झाले आहे. दुकानदारांनी धान्य वाटप करणेसाठी अधिक खबरदारीचा उपाय योजल्याचे सौ. महाले यांच्या कल्पनेवरुन लक्षात येते.
श्रीमती महाले यांना ही कल्पना कशी सुचली याबाबत विचारले असता, लाभार्थ्यांना काही अंतर ठेऊन धान्य वाटप कसे करता येईल यावर विचार केला. काही दिवस पिठाची चक्की चालविली असल्याने यातूनच ही अभिनव कल्पना सुचल्याचे सौ. महाले यांनी सांगितले. या उपक्रमासाठी पत्रा, पाईप, एलबो, रिबीट आणि स्टॅंड यासाठी ९४५ रुपये तर मजुरीसाठी रूपये ७०० रुपये असा एकूण १ हजार ६४५ रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. सुरेखा संजय महाले या पाचोरा शहरात गेल्या २० वर्षापासुन स्वस्त धान्य दुकान चालवितात. त्यांचेकडे एकूण ४७० लाभार्थी असुन हे लाभार्थी पण माझ्याच कुटूंबाचे घटक आहे. त्यांची सुरक्षितता ही माझी सुरक्षितता असल्याने मीच माझा रक्षक या उक्तीप्रमाणे ही कल्पना राबविल्याचेही सौ. महाले यांनी सांगितले. माझ्या या अभिनव उपक्रमाची जिल्हा प्रशासनाबरोबर शासनस्तरावरून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विशेष दखल घेतल्याने मी आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.