जळगाव :
स्वयंसिद्धा हा महिलांचा कार्यपरिचय करुन देणारा अंक म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान आहे असे जळगाव जनता बँकेच्या संचालिका डॉ.आरती हुजूरबाजार यांनी प्रतिपादन केले.
अनघा अजय डोहोळे यंानी संपादित केलेल्या स्वयंसिद्धा अंकाच्या प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उद्यमी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा मिनाक्षी जोशी, ब्राह्मण सेवा संस्थेच्या अध्यक्षा रेखा कुलकर्णी, उषा डोहोळे, जयश्री जोशी, मासिक ब्राह्मण डॉट कॉमचे संपादक अजय डोहोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अंकात महिला पोलीस निरिक्षक पासून सरपंच आणि डॉक्टर, वकिल, व्यावसायिक महिलांपासून सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांच्या कार्यपरिचयाबरोबर संघर्षशील महिलांच्या कर्तुत्वाची नोंद घेतल्याबद्दल डॉ.हुजूरबाजार यांनी कौतुक केले.
संपादिका अनघा डोहोळे यांनी संत ज्ञानेश्वरांनी ’माऊली’ म्हणून तर साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ माध्यमातून मातृस्वरुपी समाजावर संस्कार केले. त्याच प्रमाणे स्व.डॉ.अविनाश आचार्य यांनीही ‘समाजावर आईसारखे प्रेम करु या…’ ही कृतीतून शिकवण दिली, म्हणून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करीत स्वयंसिद्धाचे प्रकाशन करीत असल्याचे सांगितले.
मिनाक्षी जोशी व रेखा कुलकर्णी यांनीही अनघा डोहोळे यांच्या कार्याचे कौतुक करीत अभिनंदन केले. प्रारंभी अजय डोहोळे यांनी स्व.डॉ.आचार्य यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.