जामनेर शासकीय वस्तीगृहात टवाळखोरांचा हैदोस
जामनेर (प्रतिनिधी) : येथील बोदवड रोडवरील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहातील टवाळखोर विद्यार्थ्यांनी भोजन तयार करणार्यांना अश्लील शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याने येथील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव येथील एका महिला बचत गटामार्फत शासनाच्या नियमानुसार गेल्या दोन वर्षांपासून येथील वसतीगृहातील एकूण 98 विद्यार्थ्यांना दोन वेळचे भोजन, नाश्ता पुरविण्याचे काम सुरू आहे. परंतु निरंकूश झालेल्या काही टवाळखोर विद्यार्थी वारंवार भोजन बनविणार्या कर्मचार्यांना दादागिरी करीत असून वेळ प्रसंगी शिवीगाळ व धक्काबुक्की ही करत असल्याची तक्रार आहे. असाच प्रकार दि.20 रोजी रात्री सुध्दा घडला होता.
हा प्रकार घडल्यानंतर कर्मचार्यांनी भोजन
कक्षाला कुलूप लावले होते. परंतु दि.21 रोजी कर्मचारी भोजन बनविण्यासाठी गेले असता त्यांना हे कुलूप तुटलेले आढळले.विद्यार्थ्याना याविषयी विचारले असता त्यांनी कर्मचार्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून बाहेर काढले व भोजन बनविण्यास मज्जाव केला होता. याप्रकरणी पितांबर माळी यांनी या टवाळखोर विद्यार्थ्यांविरूध्द पोलीसात तक्रार अर्ज दिलेला असून पोलिसांनी वसतीगृहात जाऊन विद्यार्थ्यांना समज दिल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपुर्वी विद्यार्थ्याच्या दोन गटात हाणामारी झाली होती. त्यावेळी सुध्दा अधीक्षक गृहपाल यांना ही धक्काबुक्की करण्यात आली होती. तेव्हा सुध्दा पोलीसांनी पुढाकार घेऊन दोन्ही गटांना समज दिली होती. वारंवार अशा घटना घडत असून सुद्धा या टवाळखोर विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत कोणतीही तक्रार जात नसल्याने या घटना वारंवार घडत असल्याची चर्चा आहे. यातून भविष्यात मोठी घटना घडण्याची भितीही वर्तवली जात आहे. या टवाळखोर विद्यार्थ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अभ्यासू विद्यार्थ्यांकडून होत आहे.