स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला देणार फाशी

0

नवी दिल्ली : देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच महिला आरोपीला फाशी होण्याची शक्यता आहे. शबनम असे महिला आरोपीचे नाव असून तिने प्रियकराच्या मदतीने कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. दरम्यानं, उत्तर प्रदेशच्या मथुरा तुरुंगात महिलांना फाशी देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी तुरुंगात तयारी सुरू करण्यात आली आहे.

 

कोर्टाने दिलेल्या निर्णयाला दोषी शबनमने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली होती.

 

महिलांना फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेशातील हे एकमेव तुरुंग आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर या तुरुंगात एकाही महिला कैद्याला फाशीची शिक्षा दिलेली नाही. मथुरा तुरुंगात १८७० मध्ये फाशीघर तयार करण्यात आले होते. मात्र, तुरुंगातील नोंदीनुसार, देश स्वतंत्र झाल्यानंतर या फाशीघरात एकाही कैद्याला फाशी देण्यात आलेली नाही. मथुरा तुरुंगातील या फाशीघराच्या दुरुस्तीचे काम आता सुरू झाले आहे.

 

2008 ची ही घटना आहे. उत्तर प्रदेशमध्ये शबनम आणि सलीम या दोघांचे प्रेमसंबंध होते. शबन एका शाळेत शिक्षिका होती. तर तिचा प्रियकर सलीम हा फक्त आठवी पास होता. दोघांचे अनेक वर्ष प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्नही करायचे होते. पण कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला.

 

दोघेही मुस्लिम धर्मीय होते, पण दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. शबनम ही सैफी जातीची होती तर सलीम हा पठाण जातीचा होता. म्हणून शबनमच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. ही बाब शबनमला रुचली नाही. म्हणून 14 एप्रिल 2008 रोजी रात्री शबनम आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जाणार होती. तेव्हा शबनमने जेवणातून आपल्या कुटुंबीयांना झोपीची औषध दिले.

 

दरम्यान सलीम आणि शबनम यांच्या भेटीत नात्यात अडसर ठरणाऱ्यांचा काटा काढण्याचे ठरले.  त्यानंतर शबनमने कुऱ्हाडीने आपल्या कुटुंबातील सात जणांना ठार केले. त्यात वडील शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस, राशी, वहिनी अंजुम आणि आतेबहिण राबिया यांचा समावेश होता.  खून केल्यानंतर शबनमने अज्ञात व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना संपवल्याचा कांगावा केला होता. मात्र पोलीस चौकशीत शबनमने सर्व हकीगत सांगितली. पोलिसांनी शबनम आणि सलीमला अटक केली. शबनमने कोठडीत असताना एका बाळाला जन्मही दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.