मुख्याध्यापक पुरुषोत्तम गड्डम यांनी लॉकडाऊन कालावधीत केली किमया
बोदवड – एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं म्हणतात. म्हणूनच तिकडे लडाखमध्ये बसून मुलांसाठी काम करणारा फुनसुख वांगडू आपल्याला मोठा वाटतो. कारण त्याने आपल्या दैनंदिन जगण्यातले प्रश्न विज्ञानाच्या साह्याने सोडवण्याचा प्रयत्न केला.असंच छोटं पाऊल उचललं एणगाव हायस्कूल चे मुख्याध्यापक पुरुषोत्तम गड्डम यांनी आणि लॉकडाऊन कालावधीत शाळा बंद परिस्थितीचा उपयोग करून शाळेचं रुपडं पालटून तिला हायटेक सुद्धा केली.
बोदवड तालुक्यातील एणगाव येथे गोपाळ देवबा ढाके माध्यमिक विद्यालय आहे.या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पुरुषोत्तम गड्डम यांनी १,मार्च २०२० रोजी पदभार स्वीकारला.सुरुवातीच्या काळात जुनी इमारत व गळक्या वर्गखोल्या दुरुस्ती चे काम गड्डम यांनी स्वखर्चाने सुरू केले. वर्गखोल्या उत्तम रंगांचा वापर करून भिंती बोलक्या केल्या.संपूर्ण इमारत रंगवून त्यावर चित्रकारांच्या मदतीने निसर्ग चित्रे काढून घेतले.संपूर्ण परिसरासह प्रत्येक वर्गखोलीत सी सी टी व्ही कॅमेरे बसवून घेतले. शाळेच्या बाह्यरूपात सकारात्मक व लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येताच,गावकरी आणि माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली. संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांना विश्वसात घेऊन यासंदर्भात चर्चा करण्यात आली.आणि संस्थेच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मिळालेल्या देणगीतून मग शाळा हायटेक कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित केले.
तंत्रज्ञान दिवसागणिक बदलत असते.या बदलत्या काळानुसार शिक्षक आणि विद्यार्थी तंत्रस्नेही असावा,हा विचार मनात आला. त्यानुसार शाळेत संगणक प्रणाली हायटेक केली.लॉकडाऊन च्या काळात याच संगणकावर व्हिडिओकॉन्फरसिंग च्या माध्यमातून ऑनलाईन क्लासेस सुरु केले.प्रत्येक वर्गात स्मार्ट टी व्ही द्वारे आनन्ददायी शिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. ओपन बुक लायब्ररी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना बैठे खेळ खेळण्यासाठी इनडोअर प्ले-स्टेशन सुरू केले आहे.विज्ञान प्रयोग शाळा अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
यासंपूर्ण बदलासाठी पैसे उभे करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मदत केली. आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी तथा भारतातील सुप्रसिद्ध होरायझन ऑटोमेशन कंपनीचे संस्थापक दीपक लक्ष्मणसिंग पाटील यांनी तथा त्यांच्या मित्रबांधवांनी मोलाची मदत केली.आणि शाळा नव्या रुपात हायटेक झाली.त्यामुळे आता शाळेत विद्यार्थी संख्या वाढली आहे.सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व सरपंच सौ.अन्नपूर्णाताई विनोद कोळी आणि गावकरी बांधवांचे भरीव सहकार्य लाभल्याने ही यशोगाथा सिद्धीस आली.अशी माहिती मुख्याध्यापक पुरुषोत्तम गड्डम यांनी दिली.