स्मशानभूमी सुविधांच्या प्रतीक्षेत

0

चांगभल
धों. ज. गुरव

मो .9527003891

जळगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. वाढत्या लोकसंख्ये बरोबर नागरी वस्त्यांही वाढत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात राहणारे नागरीक सुविधा मिळाव्या म्हणून ओरडत आहे. वाढलेल्या नागरी वस्त्यांमध्ये तर सुविधांची बोंबाबोंब आहे. रस्ते, पाणी, विज आणि आरोग्य या प्रमुख सुविधा ग्रामीण भागापेक्षाही बत्तर अशा म्हणता येतील. जळगाववासिय नागरीक सुविधासाठी त्रस्त आहेत. जळगाव महानगरपालिकेतर्फे मात्र एकच पाढा वाचला जातो तो म्हणजे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. जसे नागरी सुविधांचे आहे त्याचप्रमाणे मृत्यूनंतर वैकुंठात जाण्यासाठी स्मशानभूमित सुध्दा सुविधांचा अभाव असल्याने किंवा वाढत्या लोकसंख्येनुसार स्मशानभूमिची संख्या अपूरी पडत असल्याने वैकुंठात जाणार्‍यांना स्मशानभूमीत सुध्दा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

जळगाव शहराची लोकसंख्या आजमितीला साडे सहा लाखांच्या घरात पोहचलेली आहे. शहरासाठी नेरी नाका स्मशानभूमी ही एकमेव स्मशानभूमी होती. त्यानंतर मेहरूण, पिंप्राळा आणि शिवाजी नगर येथे स्मशानभूमी निर्माण करण्यात आल्या. पैकी नेरी नाका स्मशानभूमीत त्या मानाने सुविधा बर्‍या असल्यातरी शिवाजीनगर, मेहरूण आणि पिंप्राळ्याची स्मशानभूमी यात सुविधांचा मोठा अभाव आहे. शिवाजी नगरची स्मशानभूमी थोडी बरी म्हणता येईल. मेहरूण आणि पिंप्राळ्याची स्मशानभूमीतर नावालाच आहे. पिंप्राळ्याची स्मशानभूमी म्हणजे नुसती मोकळी जागा होय. तेथे ना ओटा, ना शेड, ना लाईट आणि मृताला जेथे अग्निडाग दिला जातो तेथपर्यंत पोहचण्यासाठी रस्तासुध्दा नाही. रात्रीच्या वेळी अग्निसंस्कार करायचे असतील तर गाड्याच्या दिव्यांच्या फोकसमध्ये करावा लागतो. पावसाळ्याततर स्मशानभूमीत अग्निसंस्कार करणेच शक्य होत नाही. पिंप्राळा परिसरातील नागरीकांना एकतर नेरीनाका अथवा शिवाजी नगर स्मशानभूमीत यावे लागते. जिवंतपणी नागरी सुविधासाठी त्रस्त असणार्‍यांना मृत्यूनंतरही स्मशानभूमीत ज्या सुविधा लागतात त्याही मिळत नसल्याने नागरीक त्रस्त आहेत. पिंप्राळा स्मशानभूमीप्रमाणेच मेहरूणची स्मशानभूमी म्हणता येईल. त्याठिकाणी पाणी नाही, विज नाही, लाकडे नाहीत आणि शेडसुध्दा उपलब्ध नाही. प्रेतावर अग्निसंस्कार करण्यासाठी आलेल्यांना बसण्यासाठी जागा सुध्दा नाही. स्मशानभूमीत काटेरी झुडूपे वाढलेली आहेत. त्यामुळे त्या परिसरातील नागरीकही नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वांचा ओढा असतो. त्याचा परिणाम कधी कधी ओट्यापेक्षा जास्त प्रेतांची संख्या असते अशा वेळी ओट्याऐवजी जमीनीवर प्रेताला अग्निडाग दिला जातो ही बाब भावनिक आहे. आधीच दुःखात असलेल्या मंडळीना हे सर्व पाहून मानसिक मनस्ताप होतो. याबाबीचा महापालिकेने विचार करण्याची गरज आहे. झाडे तोडून प्रेत जाळण्यासाठी लाकडांची व्यवस्था केली जाते. पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांची तोड करणे हे चुकीचे आहे. त्यातच लाकडाच्या धुरामुळे होणारे प्रदूषण हे वेगळेचं म्हणूनच गेल्या अनेक वर्षापासून विद्युतदाहिनीची मागणी आहे. त्याकडे महापालिका लक्ष देत नाही. अनेक वेळा तेथे लाकडांचा तुटवडा जाणवतो. त्यावेळी प्रेत ओट्यावर ठेवून लाकडांची जमवाजमव करण्याची धडपड चालू असते. हे सर्व पाहून मनाला तीव्र वेदना होतात.
लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती असली तर अनेक गोष्टी सहज साध्य होतात. पण इच्छाशक्तीच नसेल तर काहीच होवू शकत नाही. त्यामुळे स्मशानभूमीत येरे माझ्या मागल्या चालू आहे. नागपूर, नाशिक, शिरपूर येथील स्मशानभूमीत एकदा जळगावच्या लोकप्रतिनिधींनी आणि अधिकार्‍यांनी फेरफटका मारावा. त्याठिकाणी स्मशानभूमीत प्रवेश केल्यानंतर आपण स्वर्गातच प्रवेश करतोय अशी भावना सर्वांच्या मनात निर्माण होतेय. गर्द झाडी, बसण्यासाठी व्यवस्थित जागा, भरपूर पाणी, प्रेतावर अग्निसंस्कार करण्यासाठी असलेले स्वच्छ ओटे, महापालिका कर्मचार्‍यांचे मिळणारे सहकार्य त्यानंतर श्रध्दांजली सभेसाठी असलेली सुव्यवस्था या सेवा मिळाल्यानंतर स्मशानभूमीत प्रेताबरोबर आलेले नातेवाईक तसेच इतर आलेल्या चाहत्यांचे दुःख थोडेसे हलके होते. शिरपूर या तालुक्याच्या ठिकाणी असलेली स्मशानभूमीतर पाहण्यासारखी आहे. तत्कालीन खा.मुकेश पटेल यांनी त्यांच्या खासदारनिधीतून त्याची उभारणी केली आहे. जे शिरपूरला होवू शकते ते जळगावात सुध्दा आमदार आणि खासदार निधी दिला तर स्मशानभूमी सुविधांनी परिपूर्ण होवू शकते. तेव्हा ते का होत नाही हा एक बिकट प्रश्‍न आहे. आता निवडणूका तोंडावर आहे. शहरवासियांनी आपल्या शहराचे आमदार आणि खासदार यांना याबाबत जाब विचारतील अशी अपेक्षा आहे.
अलिकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. खुन करून त्याची बेवारस प्रेत म्हणून परस्पर विल्हेवाट लावण्याच्या अनेक घटना समोर येताहेत. जळगाव शहरातील वैद्यकिय अधिकारी विजया चौधरी प्रेताचे पोस्ट मार्टम करण्यासाठी पोस्ट मार्टम रुममध्ये गेल्या तेव्हा त्यांच्या अंगावरील दागिने चोरण्यासाठी पोस्ट मार्टम रुममधील सहकार्‍यांनी विजया चौधरींची हत्या केली. त्यानंतर विजया चौधरींचे प्रेत बेवारस म्हणून नेरीनाका स्मशानभूमीत जाळून टाकले. पुढे त्याचा शोध लागला आणि आरोपींना अटक झाली. दुर्देवाची बाब म्हणजे कोर्टातून त्याची पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली. त्यास करीता स्मशानभूमीत सिसिटीव्ही कॅमेर्‍यांची व्यवस्था असती तर पुरावा सापडला असता. म्हणून स्मशानभूमीत सिसिटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. तेथे 24 तास विजेची उपलब्धता असावी, पाणी मुबलक असावे, बसण्यासाठी चांगली व्यवस्था या किमान सुविधा करणे गरजेचे आहे. प्रेताचा अश्मा ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा हवी ती तेथे नाही. कोठेतरी अश्मा ठेवायचा आणि नंतर शोधाशोध करायचे. अशी वेळ संबंधितांवर येते. नेरीनाका स्मशानभूमीत श्री गुजराथी समाज मित्र मंडळाच्या सहकार्याने ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत. तेवढ्याच त्याच्यात कसलीही भर महानगरपालिकेने केलेली नाही. किमान लोकसहभागातून सुविधा करण्यासाठी तरी महानगरपालिकेने प्रयत्न करावे. खास निधीतून विद्युतदाहिनी किंवा गॅसदाहिनी तेथे असणे आता काळाची गरज आहे. लोकप्रतिनिधींकडून याबाबतीत कसा पुढाकार घेतला जातो हे काळच ठरवेल.

Leave A Reply

Your email address will not be published.