भडगाव – सागर महाजन
भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी संकलित करण्यासाठी फेरी काढण्यात आली. ही रॅली महाविद्यालयापासून सुरू होऊन कासार गल्ली, नगरपालिका, खोल गल्ली, मुख्य रस्ता, तहसील कार्यालय, पाचोरा रस्ता, बढे सर संकूल, बस स्थानक अशी जाऊन पारोळा चौफुली येथे संपवण्यात आली.
केरळ राज्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या फेरीला भडगाव शहरातील व्यापारी बांधव तसेच नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या फेरीत नागरिक, व्यापारी बांधव व प्राध्यापक यांच्या सहयोगातून एकूण 10000 रुपये (अकरा हजार रूपये) संकलित झाले असून हा निधी केरळ राज्याच्या ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधीत’ ऑनलाईन पाठविला जाणार आहे, असे साहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डाॅ. अतुल देशमुख यांनी कळविले आहे.
मदतनिधी फेरीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस.आर.पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.टी.बागूल, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम.झाल्टे, साहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डाॅ. सी.एस.पाटील, प्रा. ए.एन.भंगाळे, डाॅ. एस.डी.भैसे, प्रा. जी.एस.अहीरराव, प्रा. एस.जी.शेलार, डाॅ. बी.एच.पाटील, डाॅ.एस.एन.हडोळतीकर, प्रा.एस.सी.पाटील सहभागी झाले होते. फेरीच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.