भुसावळ :- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सोलापूर येथील अॅड. राजेश कांबळे यांचा तुकडे केलेला मृतदेह नुकताच एका बंद घरात पोत्यात भरलेला आढळून आला आहे. तसेच आग्रा येथील महिला वकील अॅड. दरवेश यादव यांचीही नुकतीच हत्त्या करण्यात आली आहे. या घटनांचा निषेध येथील वकील संघाने नोंदवला असून तसा ठराव कार्यकारी मंडळाचे बैठकीमधे मंजूर करण्यास आला आहे. या संदर्भात प्रांताधिकाऱ्यांंना निवेदन देण्यात आले आहे.
अॅड. राजेश कांबळे हे दि.११ जून पासून बेपत्ता झाल्याची तक्रार सोलापूर बार असोशिएशनने स्थानिक पोलीस आयुक्तालयात दिली होती. सदर तक्रारीनंतर पोलिसांनी अॅड. कांबळे यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्या शोध मोहीमेत सोलापूर येथील पांडुरंग वस्तीतील घर बंद असून त्यातुन दुर्गंध येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पांडुरंग वस्तीमधील घरात बेपत्ता अॅड. राजेश कांबळे यांच्या शरीराचे तुकडे करून त्या तुकड्यांनी भरलेले पोते आढळून आले होते. सदर बाब अतिशय गंभीर असून या घटनेचा आणि उत्तर प्रदेशातील आग्रा येथील दरवेश यादव या भगिनीवर झालेल्या हल्ल्याचाही येथील वकील संघाने निषेध नोंदवला आहे.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍड तुषार पाटील , योगेश बाविस्कर, यांचेसह सर्व पदाधिकारी व वकील उपस्थित होते .