वाकोद, ता. जामनेर – सध्या मजुरांना आपापल्या घरी परतण्यासाठी राज्याने सूट दिल्याने मोठ्या संख्येने मजुरांचे आपल्या कुटुंबियांसोबत स्थलांतर होत असल्याने सोलापूर येथे गेलेल्या मजुरांना घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक वाकोडे गावाजवळ उलटली. यात ५ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर येथील ४८ स्त्री-पुरुष व लहान मुले मिळून तब्बल शंभर जण सोलापूरहुन (एम. एच. १३, आर. ४४९५) या क्रमांकाची आयशर गाडीने निघाले होते. आज (ता. ११) सकाळी नऊच्या सुमारास वाकोद (ता. जामनेर) जवळ पहुर रस्त्यावर भरगच्च भरलेली आयशर गाडी पलटी झाली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, अपघातस्थळी वाकोदचे पोलिसपाटील संतोष देठे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जोशी, सकाळचे प्रतिनिधी विलास जोशी यांनी तात्काळ धाव घेत, जखमींना मदत करुन डॉक्टरांकडून उपचार केले. त्यांना गाडीतून सुखरूप काढून दुसऱ्या गाडीत टाकून त्यांच्या घराकडे रवाना केले. सर्वजण साकळी (ता. यावल) येथील असल्याचे त्यांनी सांगितले. यौवळी पोलिस उपनिरीक्षक अमोल देवडे, बिट हवालदार लिंगायत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.