मुंबई : गेल्या दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरामध्ये 30 जुलैला 310 रुपये तर आज पुन्हा 10 रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 48,390 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,390 रुपये इतका आहे. चांदीच्याही दरामध्ये 30 जुलैला 1000 रुपयांची तर आज पुन्हा 10 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 68,210 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दराने पुन्हा एकदा 50 हजारांकडे प्रवास सुरु केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळत आहे.
अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणूकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे.