नवी दिल्ली : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्ताला आज सराफा बाजारात ग्राहकांची लगबग दिसून आली. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोने ५८६ रुपयांनी स्वस्त झाले असून चांदीच्या भावात एक किलोला १०६२ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा भाव ५० हजार रुपयांच्या आसपास आहे. अनलॉकच्या माध्यमातून अर्थव्यवस्था खुली होत असून आगामी लग्नसराईचा हंगामावर सराफांनी लक्ष केंद्रीत केलं आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०४०० रुपये झाला आहे. त्यात ५८६ रुपयांची घसरण झाली आहे. त्याआधी आजच्या सत्रात सोन्याने ५०१५० चा स्तर गाठला होता. एक किलो चांदीचा भाव ६२५१५ रुपये झाला असून त्यात १२८६ रुपयांची घसरण झाली आहे.
शनिवारी बाजारात झालेल्या एक तासांच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. सोने ०.२५ टक्कयांनी वाढले आणि १० ग्रॅमचा भाव ५१०५० रुपये झाला. चांदीच्या भावात ०.३२ टक्के वाढ झाली होती आणि एक किलो चांदीचा भाव ६३९४० रुपये झाला.
goodreturns.in या वेबसाईटनुसार सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९६० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०७५० रुपये आहे. त्यात शनिवारच्या तुलनेत २१० रुपयांची घसरण झाली आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९७५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५४२७० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४९०८० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५४४२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४८२१० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२५९० रुपये आहे.
जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस १८७४.८७ डॉलर असून त्यात ०.६६ टक्क्यांची घसरण झाली आहे. चांदीवर देखील नफावसुलीचा दबाव असून प्रती औंस चांदीचा भाव २४.४६ डॉलर आहे.