जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जागतिक बाजारापेठेमध्ये होणारे बदल तसेच अनेक देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीच्या मागणीवर मोठे परिणाम झाल्याने त्यांचे भाव कमी होत आहे. सोमवारी चांदीत घसरण होऊन ६६ हजार रुपये प्रतिकिलो झाली. सोन्याच्याही भावात घसरण होऊन ते ४६ हजार ४५० रुपये प्रति तोळ्यावर आले. चार महिन्यातील सोने-चांदीमधील ही घसरण नीचांकी आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सोने-चांदीचे भाव वाढत होते. त्यानंतर मात्र किरकोळ चढ-उतार सुरूच होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून ६९ हजार ५०० रुपयावर असलेल्या चांदीच्या भावात ६ ऑगस्ट रोजी ५०० रुपयाची घसरण होऊन ती ६९ हजार रुपयावर आली होती. यामुळे खरेदीचे प्रमाण काही प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, ५ मार्च २०२१ रोजी चांदीत दोन हजार रुपयांची, तर सोन्याच्या भावात ५०० रुपयांची घसरण झाली होती. यापूर्वी ४ मार्च २०२१ रोजी देखील चांदीत एक हजार ५००, तर सोन्यात ७०० रुपयांची घसरण झाली होती. २७ मे रोजी चांदीत एक हजार ३००, तर सोन्यात ६०० रुपयांची घसरण झाली होती.
संदर्भात लोकशाहीच्या लोक लाईव्ह टीमने जळगाव येथील सराफ व्यापारी बाफना ज्वेलरी आणि महावीर ज्वेलर्स यांच्यासोबत संवाद साधला. जाणून घेऊ सोने चांदीचे काय आहेत आजचे दर..
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव कमी झाल्याने आपल्याकडेदेखील भाव कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात शेअर मार्केट वाढल्याने सोन्या-चांदीचे भाव कमी झाले आहेत. आपल्याकडे या भावात लोक सोनं खरेदी करत आहेत. कारण भाव देखील घेण्यासारखे आहेत. येणाऱ्या वेळेत भाव स्थिर असतील की नाही हे मात्र सांगता येत नाही. तसेच सणासुदीच्या वेळेस सोन्या-चांदीचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतील.
– पप्पू शेठ, बाफना ज्वेलर्स
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ-उतार चालू होता, मात्र आठ दिवसांपासून सोने-चांदीचे भाव प्रचंड प्रमाणात घटले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेमधील स्थिती. घटलेल्या भावाचा फायदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहक मोठ्या प्रमाणावर करीत असून सोने खरेदीकडे वळले आहेत. मागच्या वर्षापेक्षा 25 ते 27 टक्के सोने आयात झाल्याने सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून आता भाव कमी असल्याने सोन्यात सुरक्षित गुंतवणूक करावी.
– अजय ललवाणी, महावीर ज्वेलर्स