सेवानिवृत्त शाखा अभियंत्याच्या बंद घरात चोरट्यांचा डल्ला

0

जळगाव । मुलीकडे गेलेल्या मोहन नगरातील वृंदावन गार्डनजवळील सेवानिवृत्त शाखा अभियंत्याच्या बंद घराचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी दीड हजारांची रक्कम चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांना घरात काहीही मिळून न आल्याने त्यांना खाली हात परतावे लागले. त्यामुळे चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकले होते.

पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले बापुराव श्रीराम शिरुडे हे पत्नी अर्चना यांच्यासह मोहन नगरात वास्तव्यास आहेत. शिरुडे दाम्पत्यास मुलगा मुलगी असून मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. तसेच मुलगी विवाहित असून ते देखील पुण्यात असल्याने बापुराव शिरुडे व त्यांच्या पत्नी अर्चना ह्या शुक्रवार दि.10 रोजी रात्री मुलगा व मुलगी यांना भेटण्यासाठी पुण्याला गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी शिरुडे यांच्या घराच्या मागील बाजूचा लोखंडी दरवाजा वाकवून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील तिन्ही खोल्यांमधील कपाट उघडून सामान अस्तव्यस्त फेकले होते. परंतु चोरट्यांना घरातील कपाटांमध्ये कुठलाही मुद्देमाल मिळून आला नाही.

शिरुडे कुटुंबिय पुणे येथे जाणार असल्याने त्यांनी घरात रोख रक्कम अथवा दागिने ठेवलेले नव्हते. कपाटात किरकोळ दीड हजार रुपयांची रोकड होती. सोमवारी सकाळी कामावर जायचे असल्याने बापुराव शिरुडे यांच्या पत्नी अर्चना शिरुडे ह्या घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. अर्चना शिरुडे ह्या स्टेट बँकेत नोकरीला आहे.सोमवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर शिरुडे यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे यांंच्यासह पथकाने याठिकाणी धाव घेवून माहिती जाणून घेतली. बापुराव शिरुडे हे पुणे येथे असल्याने याबाबत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती.

Leave A Reply

Your email address will not be published.