‘सेक्स टुरिझम’चा पर्दाफाश; दोन आरोपींना अटक

मुंबई; लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मोठी कारवाई करत ‘सेक्स टुरिझम’चा पर्दाफाश केला आहे. यावेळी दोन महिलांना सापळा रचून अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील दोन तरुणींचा सुटका देखील पोलिसांनी केली असल्याची माहिती समोर येत आहे.

देहविक्रय व्यवसायात महिलांना जबरदस्तीने ओढणा-या टोळीचा मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून महिलांना ग्राहकांसोबत भारताच्या वेगवेगळ्या भागात फिरण्यासाठी पाठविले जात होते. संबंधित ठिकाणी जोडपे बनून ते जात होते. एक महिला आपल्या जोडीदारासोबत मिळून अशा प्रकारचे गुन्हे करण्यास प्रवृत्त करत होती.

गुन्हे शाखेच्या पथकाला ही माहिती २०२० मध्ये देहविक्रय व्यवसायाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेकडून मिळाली होती. त्यानंतर मुंबई विमानतळावर गुन्हे शाखेच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात दोन महिलांना अटक करण्यात आली. तर या व्यवसायात जबरदस्तीने ओढल्या गेलेल्या दोन महिलांची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेविरुद्ध भादंविच्या कलम ३७० (२)(३) आणि पिटा(PITA) च्या कलम ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही टोळी ग्राहकांना शोधत असे. एखादा ग्राहक त्यांच्या जाळ्यात आला आणि डील फायनल झालीच, तर त्याला महिलांसोबत भारतातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर पाठवले जात होते. त्यांचे गोवा हे सर्वात आवडीचे स्थळ होते. ही टोळी ग्राहकांना आधी मुलींचे फोटो पाठवत होती. मुलगी पसंद पडताच ग्राहकांना गोवा किंवा दुसर्या पर्यटनस्थळी पाठवले जात होते. यासाठी विमानाची तिकिटे ग्राहकांना स्वतःलाच बुक करावे लागत होते. ग्राहकांकडून ही टोळी दोन दिवसांचे ५० हजार रुपये घेत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला त्यांच्याकडून २० टक्के कमिशन घेत होती. अशा पद्धतीने ग्राहक पसंत पडलेल्या मुलीसोबत दोन दिवस गोवा किंवा इतर ठिकाणी फिरून मुंबईला परतत होते.

गुन्हे शाखेने या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामधील एकाचे नाव आबरून अमजद खान ऊर्फ सारा आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव वर्षा दयालाल असे आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, या टोळीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एक बनावट ग्राहक तयार केला. बनावट ग्राहकाने आरोपी महिलेशी संपर्क करून त्यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्याने मुलीची मागणी केली. बनावट ग्राहकाने गोव्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले. दोन्ही आरोपी दोन महिलांना घेऊन विमानतळावर पोहोचताच, तिथे आधीपासूनच दबा धरून बसलेले पीएसआय स्वप्नील काळे आणि त्यांच्या पथकाने तीन महिलांना थांबविले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत असे कळाले की, त्यांच्यापैकी चौथी मुलगी बोर्डिंग पास घेऊन आत गेली आहे. नंतर सीआयएसएफच्या मदतीने संबंधित महिलेला विमानतळाच्या बाहेर काढून ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांची छापेमारी वाढल्याने मुलींना काम करताना भीती वाटत होती. त्यामुळे कोणालाही शंका येऊ नये यासाठी गोवा आणि  दुसऱ्या पर्यटनस्थळावर फिरायला पाठवले जात होते. चौकशीअंती आरोपी महिलेने गुन्हा कबूल केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here