सुरत रेल्वे गेटवरील खोळंब्याचा दुसरा बळी

0

वेळीच उपचार न मिळाल्याने महिलेचे निधन

जळगाव दि.17-

सुरत रेल्वे पुलावरील बंद गेटमुळे वेळीच उपचार न मिळाल्याने कपिल पाटील या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना उपचाराअभावी महिलेचा वाटेतच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेने सूरत रेल्वे गेटवरील खोळंब्याने दुसरा बळी घेतला आहे. याबाबत शिवाजीनगर परिसरात खळबळ उडाली असून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तर नरभक्षक प्रशासनाला पर्यायी रस्त्यासाठी आणखी किती बळी हवे? असा सवाल जनमानसातून विचारला जात आहे.
शिवाजी नगरातील रहिवासी महेश आनंदा पाटील यांचा मुलगा कपिल महेश पाटील (14) याची दि. 15 रोजी रात्री 10.40 वा. तब्येत खराब झाल्यामुळे शिवाजी नगरातून वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सुरत रेल्वे गेटवर एक तास उशीर झाल्याने उपचाराअभावी या निरागस बाळाचा जीव गेला. ही घटना ताजी असतानाच रविवारी शिवाजी नगर परिसरातील रहिवासी कमलबाई सुरेश सावदेकर(75) यांची दुपारी 2.30 वा. तब्येत खराब झाली. यावेळी परिसरातील डॉ. वाघ मॅडम यांना बोलावले. उपचारानंतर त्यांना बरे वाटले त्या झोपल्या मात्र थोड्या वेळाने पुन्हा त्रास झाल्याने डॉ. वाघ मॅडम यांना बोलावले असता त्यांना मायनर अ‍ॅटक आला असल्याने त्यांनी हॉस्पिटलला अ‍ॅडमीट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना कारमधून आर्कीड हॉस्पिटल येथे जाण्यासाठी शिवाजी नगर पुलामुळे सूरत रेल्वे गेटवरुन नेत असताना गेट बंद असल्याने अर्धा तास उशिर झाला. कमलबाई सावदेकर यांची आर्कीड हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट अगोदरच चालू आहे. अत्यवस्थ असलेल्या कमलबाई यांना उपचार मिळण्याआधीच त्यांचे प्राणोत्क्रमण झालेले होते. तेथे नेल्यावर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. सुरत रेल्वेगेटवर झालेल्या उशिरामुळे व आर्कीड हॉस्पिटल येथेही वेळ लागला. त्यांना वेळेतच उपचार मिळाले नाहीत. जर रेल्वेगेटवर उशिर झाला नसता तर त्यांना वेळीच उपचार मिळून त्यांचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया त्यांचा मुलगा नितीन सावदेकर यांनी लोकशाहीशी बोलताना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.