सूरत: गुजरातमधील सूरत येथे असलेल्या ओएनजीसीच्या प्लाण्टला भीषण आग लागली आहे. हाझिरा येथील ओएनजीसीच्या प्लाण्टमध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लागोपाठ तीन स्फोट झाले. प्लाण्टमध्ये मोठे स्फोटाचे आवाज झाले आणि त्यानंतर आगीचे लोळ उठले. यासंदर्भातील व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटवरुन पोस्ट केला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
ओएनजीसीमध्ये झालेले हे स्फोट इतके भीषण होते की दहा किलोमीटरपर्यंत ते ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या ठिकाणी पहाटे चार पासूनच आग विझवण्याचे काम अग्निशामन दलाच्या जवानांकडून केलं जात होतं. तीन साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसून कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही, असं ओएनजीसीने स्पष्ट केलं आहे.
ओएनजीसीच्या सूरतमधील प्लॉण्टमध्ये यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. २०१५ साली इथं लागलेल्या आगीत १२ जण जखमी झाले होते.