सुरक्षा दलांनी आयएसआयचा नापाक कट उधळला

0

जम्मू -इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा मोठा नापाक कट भारतीय सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. जम्मू विभागात पुन्हा दहशतवाद फैलावण्याचा आयएसआयचा डाव होता. मात्र, आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांना अटक करून भारतीय सुरक्षा दलांनी तो फोल ठरवला.

भारतीय लष्कराच्या जम्मूमधील एका ठाण्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ काढताना दोन हेरांना मे महिन्यात रंगेहाथ पकडण्यात आले. मुश्‍ताक अहमद मलिक आणि नदीम अख्तर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या चौकशीतून आयएसआयच्या कटाचा पर्दाफाश झाला.

विशेष म्हणजे, त्या लष्करी ठाण्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न मागील वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्या ठाण्याबाहेरील सुरक्षारक्षकावर गोळीबार केला होता. त्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अटक करण्यात आलेल्या हेरांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी जम्मू विभागात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आणखी चौघांविषयीची माहिती दिली. त्यावरून सद्दाम हुसेन, मोहम्मद सलीम, मोहम्मद शफी आणि सफदर अली या हेरांना पकडण्यात आले.

त्या हेरांनी इफ्तिकार नावाच्या आयएसआय अधिकाऱ्याच्या आणि हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची कबुली दिली. पाकव्याप्त काश्‍मीरमधून त्यांना सूचना मिळत होत्या. जम्मू विभागातील तरूणांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी त्या हेरांवर सोपवण्यात आली होती.

अटक करण्यात आलेले सर्व हेर पाकिस्तानच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांचे रहिवासी आहेत. त्यांच्या आणखी काही साथीदारांना लवकरच अटक होण्याची शक्‍यता आहे. अटक करण्यात आलेल्या हेरांकडून काही मोबाईल फोनचे पाकिस्तानी नंबरही मिळाले आहेत. भारतीय सुरक्षा दलांनी सतर्कता दाखवून वेळीच आयएसआयचा कट हाणून पाडण्यात यश मिळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.