सुधीर मुनगंटीवारांच्या बाळबोध प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील ; शिवसेनेची टीका

0

मुंबई : भाजपचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. या वादावर भूमिका मांडताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसे म्हणता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यावरून शिवसेनेनं मुनगंटीवारांना टोला लगावला आहे.  “सुधीर मुनगंटीवार यांनी एक बाळबोध प्रश्न विचारला आहे. ‘जाणता राजा’ हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले. त्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील,” अशा शब्दात मुनगंटीवारांवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून  टीका केली आहे. तसेच शरद पवारांचं कौतूकही केलं आहे.

काय म्हटले अग्रलेखात 

शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी व शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न जेव्हा जेव्हा उभा राहिला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र खडबडून जागा झाला व पेटून उठला. पंडित नेहरू असतील, नाहीतर मोरारजी देसाई, सगळ्यांनाच शिवरायांपुढे नतमस्तक व्हावे लागले. आताही तेच झाले. ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उठल्यावर भाजपवाल्यांना नमते घ्यावे लागले. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरून काढू नयेत हीच अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात एका पुस्तकावरून वाद पेटला आहे. त्या पुस्तकाशी भारतीय जनता पक्षाचा संबंध असल्याने वादात राजकारण घुसले, पण हे वादग्रस्त पुस्तक मागे घेतल्याचे भाजपने जाहीर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाशी भाजपचा संबंध नाही, असे शेवटी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना जाहीर करावे लागले. अर्थात प्रश्न असा आहे की, भाजप म्हणते, लेखक गोयल याने पुस्तक मागे घेतले, पण हा उपटसुंभ गोयल म्हणतोय, ‘छे, छे. मी पुस्तक मागे घेतले नाही, घेणार नाही.’ आता नव्याने लेखक म्हणतो, मी पुस्तकाचे पुनर्लेखन करणार. म्हणजे गोंधळ सुरूच आहे. गोयल याला जे ओळखतात ते ठामपणे सांगू शकतात की, हा माणूस खोटय़ा प्रसिद्धीचा भुकेला आहे व यानिमित्ताने त्याला ती प्रसिद्धी मिळाली आहे. आणखी काही काळ त्याला ही प्रसिद्धी मिळू शकेल. गृहमंत्री अमित शहा यांनी आता असे जाहीर केले की, ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. अशा घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात पाठवू.’ अशा वक्तव्यांमुळेही लोकांच्या भडकलेल्या भावना आणखी पेटत असतात. बरं, असे जर असेल तर भाजप कार्यालयात ‘नरेंद्र मोदी हेच शिवाजी’ असे सांगणाऱ्या लेखकावर त्याच कायद्याने कारवाई का झाली नाही? कारण याच प्रकरणामुळे राज्यातले वातावरण पेटले आहे. ते प्रकरण भीमा-कोरेगाव दंगलीसारखे होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे. पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला.असेही शिवसेनेनं केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.